परभणी : धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न-कन्हैयाकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:22 AM2018-08-25T00:22:05+5:302018-08-25T00:23:17+5:30
आझादीवर बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल केले जात आहेत आणि धर्माच्या नावावर राजकारण करुन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आझादीवर बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल केले जात आहेत आणि धर्माच्या नावावर राजकारण करुन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
परभणी येथे ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत कन्हैय्याकुमार याच्या सभेचे शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी तो बोलत होता. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजीमंत्री सुरेश वरपूडकर, शेकापचे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, माजी खा.तुकाराम रेंगे, भगवान वाघमारे, कॉ.राजन क्षीरसागर, गुलाम मोहम्मद मिठ्ठू, अशफाक खान, स्वा.सै.सय्यद आझद, उपमहापौर माजूलाला, भन्ते मुदितानंद, किरण सोनटक्के, किर्तीकुमार बुरांडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, देशात आझादीवर बोलणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, वाढते अत्याचार, महागाई या विषयांकडे लोकांचे लक्ष जावू नये म्हणून व त्यांना या विषयांचा विसर पडावा म्हणून धर्माच्या नावावर राजकारण करुन समाजामध्ये मतभेद निर्माण केले जात आहेत. जाती-जातींमध्ये, धर्मा-धर्मांमध्ये फूट पाडून २० टक्के लोक, ८० टक्के लोकांवर राज्य करीत आहेत. त्यामुळे या विचारांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद बाजुला सारुन एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला समानतेचा अधिकार देणारे भारतीय संविधान संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वृत्तींना मुँहतोड जवाब देण्यासाठी ‘संविधान बचाव, देश बचाव’ मोहीम राबविली जात आहे, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला.
यावेळी बोलताना आ.दुर्राणी म्हणाले की, देशात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींना समान न्याय देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून करण्यात आले आहे; परंतु, हेच संविधान आता धोक्यात आले आहे. त्यामुळे विविध पक्षाचे आम्ही नेते एकत्र आलो आहोत. जनतेनेही आता एकत्र येणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना माजीमंत्री वरपूडकर म्हणाले की, भारतीय संविधानाच्या प्रती जाळून लोकशाहीवर घाला घालण्याचा केलेला प्रयत्न सर्वांनी एकत्र येऊन हाणून पाडला पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी मराठा आरक्षणास पाठिंबा देण्याचा व आरक्षण आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव संमत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि सोनकांबळे यांनी तर कार्यक्रम आयोजनामागची भूमिका कॉ.राजन क्षीरसागर यांनी विषद केली. सूत्रसंचालन कॉ.माधुरी क्षीरसागर व यशवंत मकरंद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी देशाच्या सिमेवर शहीद झालेले जवान, मराठा, धनगर आरक्षण लढ्यात शहीद झालेले कार्यकर्ते, केरळमधील पुरामध्ये मयत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मराठा- मुस्लिम- धनगर आरक्षण समानतेसाठी हवे
४यावेळी मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, आज घडीला या समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. खाजगीकरणामुळे त्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे समानतेची संधी मिळण्यासाठी त्यांना आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. या समाजांच्या आरक्षणासंदर्भात चुकीची माहिती पसरविली जात आहे. कोणाचे काढून घेऊन आरक्षण द्या, असे म्हणत नाही, तर त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्या, असे कन्हैयाकुमार म्हणाला. मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसी, दलित आदी सर्व समाजाचे प्रश्न एकच आहेत, समस्या एकच आहेत. एकाच समस्येशी हे सर्व झगडत आहेत. तर मग या सर्वांनी एकत्र येण्यास काय हरकत आहे, असा सवाल करुन कन्हैय्याकुमार म्हणाला की, हे सर्व समाज एकत्र येऊ नये म्हणून खोट्या अफवा पसरविणाºया वृत्ती कार्यरत आहेत, हे आपण जाणले पाहिजे.
मंदिराच्या नावावर पैसे जमवून भाजपाने कार्यालय उभारले
४यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, अफवांवर बिलकूल विश्वास ठेवू नका, ‘अच्छे दिन आयेंगे’ ही अफवाच आहे. मंदिराच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले गेले आणि आता भाजपाचे दिल्लीत अलिशान कार्यालय उभारले गेले. सनातन नाव असणारी संस्था त्या विचारांची असतेच असे नाही किंवा भगवा ध्वज हातात घेतलेली व्यक्ती हिंदू विचारांची असतेच, असेही नाही. दाखवायचे एक आणि करायचे एक, अशा वृत्ती सनातनी विचार प्रवृत्तींकडून आचरणात आणल्या जात आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे, गौरी लंकेश, डॉ.एम.एम.कलबुर्गी हे कोणत्या धर्माविरुद्ध किंवा जातीविरुद्ध बोलत नव्हते तर ते धर्म चिकित्सा व विज्ञानवाद सांगत होते; परंतु, धर्माच्या नावावर राजकारण करणाºयांचे पितळ उघडे पडत असल्याने त्यांची हत्या केली गेली, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला.