परभणी : गोदावरीवर ३४ कोटी खर्चून होणार दोन पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:39 AM2018-11-22T00:39:41+5:302018-11-22T00:40:39+5:30
जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पुलांच्या मागणीचा प्रश्न निकाली निघणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरीनदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पुलांच्या मागणीचा प्रश्न निकाली निघणार आहे़
परभणी ते पालम या ताडकळसकमार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या गावाजवळ गोदावरीनदीवर कमी उंचीचा पूल अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे़ गोदावरी नदीला पूर आल्यानंतर हा रस्ता अनेक वेळा बंद झालेला आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत होती़ शिवाय हा जुना पूल असल्याने येथे नव्याने पूल उभारण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती़ याशिवाय पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे़ त्यामुळे या बंधाºयात अधिक पाणीसाठा झाल्यास जुना पुल पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता होती़ त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर चर्चाही झाली; परंतु, पुलाची उंची वाढविण्याऐवजी थेट नव्यानेच पूल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला़ त्यानुसार आता या पुलाच्या २० मीटर बाजुला नव्याने पूल उभारण्यात येणार आहे़ जुन्या पुलापेक्षा साडेचार मीटर अधिक उंचीचा हा पूल राहणार आहे़ यासाठी १९ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ हा निधीही राज्यस्तरावर उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत़ १० डिसेंबरपर्यंत या कामासाठी इच्छुक कंत्राटदारांना निविदा सादर करता येणार आहेत़
त्यानंतर निविदा मंजुरी व प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे़
साधारणत: जानेवारी अखेरपर्यंत ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल़ त्यानंतर कंत्राटदार निश्चित होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे़
वझूरजवळील पुलामुळे लातूरचे अंतर घटणार
पूर्णा तालुक्यातील पिंगळी-ताडलिमला-वझूर-रावराजूर-मरडसगाव या राज्य महामार्ग ३५ क्रमांकावर वझूर गावाजवळील गोदावरी नदीवर पूल उभारण्यात येणार आहे़ या पुलाच्या कामाचे भूमीपूजन २४ जून रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते़ आता या रस्ता कामासाठी १५ कोटी ९ लाख ५२ हजार २८१ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ त्यामुळे या कामाच्याही निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ नोव्हेंबर रोजी काढल्या आहेत़ त्यानुसार इच्छुक कंत्राटदारांना १५ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत़ त्यानंतर २१ डिसेंबर रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत़ याच दिवशी या कामाचा कंत्राटदार निश्चित होणार आहे़ त्यामुळे या प्रलंबित बहुप्रतीक्षित रस्त्यावरील पुलाचा प्रश्नही मार्गी लागला आहे़ या रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल झाल्यास नांदेड-हिंगोली-नागपूरहून येणाºया वाहनांना त्रिधारा पाटी-पिंगळी-लिमला-वझूरमार्गे लातूरला जाता येणार आहे़ यामुळे जवळपास ५० ते ६० किमी लातूरचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार या पुलाचा ८ ते ९ तालुक्यांना लाभ होणार आहे़ तसेच या भागात दळणवळणाची साधनेही वाढणार आहेत़
पुलांची वेगाने कामे होण्याची गरज
४जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील दोन्ही मोठ्या पुलांच्या कामासाठी जवळपास ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे़ या कामाच्या निविदाही निघाल्या आहेत़ त्यामुळे प्रत्यक्ष कामाला निविदा प्रक्रियेनंतर तातडीने सुरुवात होणे आवश्यक आहे़
४एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे़ त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते़ त्यामुळे तत्पूर्वीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे़ यासाठी प्रशासकीय पातळीवरून सूत्रे हलणे गरजेचे आहे़