परभणी : दोन बसेस घसरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:21 AM2019-08-03T00:21:46+5:302019-08-03T00:21:55+5:30
जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
परभणी शहरातून जाणारे परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- पाथरी व परभणी-वसमत हे चारही महामार्ग पुनर्बांधणीसाठी मागील सहा महिन्यांपासून खोदण्यात आले आहेत. हे महामार्ग खोदल्यानंतर या रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला पक्का रस्ता तयार करुन देणे अपेक्षित होते; परंतु, संबंधित विभागाचे दुर्लक्ष व कंत्राटदारांनी दाखवलेल्या उदासीन भूमिकेमुळे कच्च्या रस्त्यावरुनच वाहनधारकांना या चारही महामार्गावरुन वाहने चालवावी लागत आहेत.
परभणी जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिंतूर- परभणी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. या चिखलमय रस्त्यावरुन धावणाºया वाहनांमध्ये दररोजच अपघाताच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुक्यात पाऊस झाला. या पावसामुळे हा महामार्ग चिखलमय झाला. परिणामी, परभणी तालुक्यातील झरी गावानजीक जिंतूरकडून येणाºया औरंगाबाद- निजामाबाद व जिंतूरकडे जाणाºया वसमत -औरंगाबाद या दोन गाड्या एकमेकांना साईड देताना रस्त्याच्या खाली घसरल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक जण बसखाली उतरण्यासाठी धडपड करु लागले. त्यातच काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखूवन बसला असलेल्या आपतकालीन खिडकी उघडून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरूस्त करावा अशी मागणी होत आहे.
निसरडी वाट : अपघाताच्या घटना झाल्या नित्याच्याच
४परभणी- जिंतूर हा महामार्ग पुनर्बांधणीसाठी ठिकठिकाणी खोदण्यात आला. मात्र वाहनांना ये-जा करण्यासाठी कोणताही पक्का रस्ता तयार करुन देण्यात आला नाही. थोडासा पाऊस झाला तर परभणी तालुक्यातील धर्मापुरी, झरी, टाकळी कुंभकर्ण तर जिंतूर तालुक्यातील बोरी या गावानजीक वाहने रस्त्यावरुन घसरण्याच्या घटना दररोज घडत आहेत.
४त्यामुळे तासन्तास वाहतुकीची कोंडी होत आहे. छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. जिंतूरकरांनी या रस्त्यासाठी पावसाळ्याचा धोका ओळखून वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; परंतु, ‘शासकीय काम महिनाभर थांब’ या म्हणी प्रमाणेच जिंतूरकरांच्या मागणीलाही शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.