परभणी:दोन चंदन तस्करांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:28 AM2018-09-22T00:28:49+5:302018-09-22T00:29:33+5:30
पूर्णा ते हयातनगर रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरत असणाऱ्या दोन चंदन तस्करांना २० सप्टेंबर रोजी पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : पूर्णा ते हयातनगर रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरत असणाऱ्या दोन चंदन तस्करांना २० सप्टेंबर रोजी पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पूर्णा पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत पवार, शेखर कलवले, चंद्रमुनी हनवते, लतिफ पठाण, मिलिंद कांबळे हे हयातनगरमार्गे पूर्णा येथे येत असताना दोन व्यक्ती दुचाकीवर पूर्णेकडे येत होत्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते थांबले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी या दुचाकीचा पाठलाग केला. सुहागन या गावाजवळ दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शेख दाऊद शेख चॉंद पाशा व सय्यद निसार सय्यद निजाम (दोघे रा.कुरुंदा ता. वसमत) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. दुचाकीची तपासणी केली तेव्हा त्यात चंदनाचे झाड तोडण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळून आले.
दोन वर्षापूर्वी पहाटेच्या सुमारास चंदनाचे लाकुड कापून ते घेऊन जात असताना पूर्णा- नांदेड रस्त्यावर या दोघांनाही पोलिसांनी अडविले होते; परंतु, त्यावेळी हातातील पिशवी फेकून देत या आरोपींनी पलायन केले होते. त्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात भारतीय वनकायदा, महाराष्ट्र वृक्षतोड कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.