Parbhani: दुचाकी चार चाकीचा भीषण अपघात, पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू
By ज्ञानेश्वर भाले | Published: January 14, 2024 11:20 PM2024-01-14T23:20:16+5:302024-01-14T23:20:31+5:30
Parbhani News: पोखर्णी पाथरी मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले.
- ज्ञानेश्वर भाले
दैठना/ सोनपेठ (परभणी) : पोखर्णी पाथरी मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहन जळून खाक झाले. यात प्रभाकर मारोतराव गवारे (५६, रा. पाथरी) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. रविवारी रात्री ते परभणी येथून सोनपेठकडे दुचाकीने जात होते. दरम्यान भारसवाडा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी क्रमांक (एम एच १२ एम एल ४७५०) वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. दरम्यान काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागल्याने त्या खाक झाल्या. या दरम्यान चार चाकी वाहनातील प्रवासी आग लागण्याअगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके, बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी गाव घेत मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले. अपघात इतका भीषण होता की काही क्षणात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या.
नुकतीच मिळाली होती पदोन्नती
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे २०१९ साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते. काही महिन्यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.