परभणी आगारातील प्रकार;ड्युटी न मिळाल्यास टाकली जातेय रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:38 AM2018-09-22T00:38:15+5:302018-09-22T00:39:07+5:30
बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण्याच्या या प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
परभणी आगारामधून दररोज सकाळी वाहक आणि चालकांना बसगाड्यांचे नियोजन करुन ड्युटी दिली जाते. त्यामुळे येथील आगारात सकाळी वाहक-चालक उपस्थित राहतात; परंतु, अनेकांना ही ड्युटी मिळत नाही.
परभणी आगारामध्ये बसगाड्यांची संख्या कमी असल्याने सर्व मार्गावर बसफेºया चालविल्या जात नाहीत. परिणामी दररोज तीन ते चार चालक-वाहकांना ड्युटीच मिळत नाही. हे वाहक-चालक नियमानुसार सेवेसाठी हजर झाल्याने त्यांची त्या दिवसाची सेवा ग्राह्य धरणे अपेक्षित आहे; परंतु, या चालक-वाहकांकडून रजा घेतली जाते. त्यावर ‘कामगिरी नाही’, असा उल्लेखही केला जातो. वाहक आणि चालकांना ड्युटी देण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळाची आहे. महामंडळ चालक-वाहकांना काम उपलब्ध करुन देत नसेल तर त्यांच्याकडून रजा घेणे नियमबाह्य आहे. यात चालक आणि वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एस.टी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन वाहक-चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात प्रभारी आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार फोन केले; परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने आगाराची बाजू समजू शकली नाही.
खराब रस्त्यांचाही कर्मचाºयांना फटका
परभणी आगारामध्ये एकूण ३१० चालक, वाहक आहेत. तसेच ६५ बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी १० बसगाड्या नादुरुस्त असतात. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ५५ बसगाड्यांचाच वापर होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील बससेवा ठप्प आहे. परिणामी सर्व वाहक-चालकांना दररोज ड्युटी मिळत नाही आणि सेवेवर हजर झाले असतानाही महामंडळाच्या नियोजनाअभावी वाहक, चालकांची रजा घेतली जात आहे.
अतिरिक्त कामाचा मोबदला मिळेना
वाहक आणि चालकांना नियमानुसार २०० कि.मी. अंतरापर्यंची ड्युटी देऊन ८ तासांची सेवा त्यांच्याकडून करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात काही वाहक, चालकांना ३०० कि.मी.ची ड्युटी देऊन १२ तासांपर्यंतची सेवा करुन घेतली जात आहे. अतिरिक्त ४ तासांच्या सेवेचा मोबदलाही मिळत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केल्या.
असा प्रकार होत नाही
ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने बससेवा पोहचविण्यासाठी वेळ लागत आहे. काही वाहक-चालक ठराविक रुटसाठीच आग्रह धरतात; परंतु, वाहक आणि चालकांना ड्युटी भेटत नाही, असा प्रकार होत नाही. एखाद्या वाहक-चालकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल.
-जालिंदर सिरसाट, विभागीय नियंत्रक