परभणी: २० हजार मजुरांवर बेरोजगारीची कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:58 PM2019-04-01T23:58:16+5:302019-04-01T23:59:05+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
‘मागेल त्याला काम’ देण्याच्या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतामध्ये कामे शिल्लक नाहीत. परिणामी मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहे. आॅक्टोबर महिन्यापासून मजूर मंडळी कामाच्या शोधात असताना दुसरीकडे रोजगार हमी योजनेची कामेही सुरु होत नसल्याने मजुरांची उपासमार होत होती. जानेवारी महिन्यापासून रोहयोच्या कामांची संख्या वाढली. त्यामुळे मजुरांना स्थानिक पातळीवर काम उपलब्ध होऊ लागले. दुष्काळी परिस्थितीत रोहयोचे हक्काचे काम मिळत असल्याने मजुरांची आर्थिक समस्या काहीशी दूर झाली होती. मात्र ही परिस्थिती जास्त काळ टिकली नाही. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर नवीन कामांना मंजुरी देण्यास बंधने निर्माण झाली. परिणामी मागील १५ दिवसांपासून एकही नवीन काम सुरु झाले नाही.
रोहयोच्या कामांच्या स्थितीचा आढावा घेतला असता २२ हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची ११७१ कामे सुरु होती. या कामांवर ४१ हजार १९५ मजुरांना काम मिळाले. ही कामे साधारणत: १५ दिवसांपर्यंत सुरु राहिली. त्यानंतर मात्र आचारसंहितेमुळे एकाही कामाला मंजुरी मिळाली नाही. जुनीच कामे सध्या सुरु आहेत. २१ ते २७ मार्च या आठवड्यात जिल्ह्यामध्ये ५०१ कामे सुरु होती. या कामांवर १९ हजार ९४५ मजुरांना काम मिळाले. फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सुरु असलेल्या कामांमधून ६७० कामांची घट झाल्याने मजुरांची उपस्थितीही कमी झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांच्या काळात एकाही नवीन कामाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सुमारे २२ हजार २ मजुरांना आचारसंहितेचा फटका सहन करावा लागत आहे. आता नवीन कामे सुरु होण्यासाठी किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असून आचारसंहिता संपल्यानंतरच नवीन कामे सुरु होण्याची शक्यता आहे.
दुष्काळी परिस्थितीत हाताला काम मिळत नसल्याने आधीच मजूर मंडळी अडचणीत असताना त्यात आचारसंहितेची भर पडल्याने जिल्ह्यातील मजुरांच्या समस्या वाढल्या आहेत.
घरकुले, सिंचन विहिरींची कामे
४रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आचारसंहितेपूर्वी ज्या कामांना मंजुरी दिली होती. ती सध्या सुरु आहेत. रोहयो विभागाकडून पंचायत समितीमार्फत सिंचन विहिरी, विहिरींचे पूनर्भरण, घरकुल योजनेंतर्गत घरकुल बांधकाम, रोपवाटिका आणि तुती लागवड ही कामे सध्या केली जात आहेत. यातील बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४०५ कामे सुरु असून त्यावर १६ हजार ४१७ मजूर काम करीत आहेत. तर शासकीय यंत्रणेअंतर्गत ९६ कामे सुरु असून त्यावर ३ हजार ५२८ मजुरांना कामे मिळाली आहेत.
पालम तालुक्यात रोहयोला फाटा
४जिल्ह्यात रोहयोची ५०१ कामे सुरु असली तरी पालम तालुक्यात मात्र एकही काम सुरु नसल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. तर परभणी तालुक्यामध्ये केवळ ५ कामे सुरु असून या कामांवर २७० मजूर कामे करीत आहेत. मानवत तालुक्यात ४४ कामांवर ३ हजार १८० मजूर, जिंतूर तालुक्यात ५२ कामांवर १८३ मजूर, पाथरी तालुक्यात ४० कामांवर २ हजार ७६० मजूर, पूर्णा तालुक्यात ११० कामांवर ६ हजार १९०, सेलू तालुक्यात १६६ कामांवर ४ हजार ८१२ आणि गंगाखेड तालुक्यात ८४ कामे सुरु असून या कामांवर १ हजार ६२६ मजुरांना काम मिळाले आहे.