परभणी : सेंद्रीय शेतीसाठी विद्यापीठांना निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:42 AM2018-12-30T00:42:18+5:302018-12-30T00:42:43+5:30
सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यातील चारही विद्यापीठांना निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ यातून सेंद्रीय शेतीसाठी संशोधन होवून बाजारपेठ, उत्पादन आणि निविष्ठांचा वापर याबाबत उपयुक्त काम केले जाईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यातील चारही विद्यापीठांना निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ यातून सेंद्रीय शेतीसाठी संशोधन होवून बाजारपेठ, उत्पादन आणि निविष्ठांचा वापर याबाबत उपयुक्त काम केले जाईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले़
सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ढवण बोलत होते़ विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, सेंद्रीय शेती तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडखे, रोमीफचे अध्यक्ष डॉ़ प्रशांत नाईकवाडे, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ़ आनंद गोरे यांची उपस्थिती होती़
डॉ़ ढवण म्हणाले, राज्यातील चार विद्यापीठांपैकी परभणी जिल्ह्यासाठी होणारा हा पहिला कार्यक्रम असून, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी देखील प्रशिक्षण आयोजित केले आहे़ सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी शेतकरी अथवा शेतकरी गटांनी यासाठी लागणारी जैविक खते, निविष्ठा आदी आल्या शेतावरच तयार कराव्यात़ यामुळे सेंद्रीय शेतीवरील खर्च कमी होवून ती यशस्वी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले़ डॉ़ वासकर, बोडखे, डॉ़ नाईकवाडे यांनी या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत माहिती दिली़ डॉ़ आनंद गोरे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी उपस्थित शेतकरी, प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमास कृषीतज्ज्ञ, शेतकरी उपस्थित होते़