परभणी: स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच युपीएससीत यश- सृष्टी देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:12 AM2019-04-30T01:12:59+5:302019-04-30T01:13:50+5:30
युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़
येथील जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी सृष्टी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला़ संस्थेच्या सचिव लक्ष्मीताई देशमुख, रविराज देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सृष्टी देशमुख म्हणाल्या, मोठे होण्यासाठी मोठे स्वप्न पाहण्याची गरज आहे़ एकदा ध्येय निश्चित झाले तर सातत्यपूर्ण परिश्रमातून त्या दिशेने जाणे शक्य आहे़ केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन करीत असताना अखेरच्या वर्षी शेवटच्या पेपरनंतर अवघ्या चौदा दिवसांनीच युपीएससीची परीक्षा होती़ दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला़ तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू केली होती़ अवांतर वाचन केल़े़ कोचिंग क्लासही लावल्याने प्रयत्नांना निश्चित दिशा मिळाली़ इंटरनेटचा वापर केल्याने त्याचाही फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले़ प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळत असल्याने सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या़ तत्पूर्वी आयोजित सत्कार कार्यक्रमास संस्थेच्या सचिव लक्ष्मीताई देशमुख, रविराज देशमुख, जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अॅड़ अशोक सोनी, सभापती सुनील देशमुख, मोनाली सरनाईक, जि़प़ सदस्य अंजली देशमुख यांच्यासह जयंत देशमुख, सुनीता देशमुख आदींची उपस्थिती होती़
भोपाळमध्ये संपूर्ण शिक्षण झालेल्या सृष्टी देशमुख यांचे जिंतूर हे आजोळ आहे़ येथील रविराज देशमुख यांच्या त्या भाची असून, कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांना सृष्टी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभावे, या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़