परभणी : ऊसतोडीच्या वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:29 AM2018-10-22T00:29:06+5:302018-10-22T00:29:27+5:30
ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. या मारहाणीत १० जण जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. या मारहाणीत १० जण जखमी झाले आहेत.
महातपुरी येथील एका ऊसतोड कामगाराने ऊसतोडीला जाण्यासाठी इसाद येथील मुकादमाकडून उचल घेतली होती. मात्र ऊसतोडीसाठी जाण्यास तो चालढकल करु लागला. त्यामुळे मुकादमाने २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी महातपुरी येथे येऊन त्याचा शोध घेतला; परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे मुकादम व ऊसतोड कामगाराच्या पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेला. त्यातूनच दोन गटात हाणामारी झाली. या मारहाणीत सुरेश गणेश राठोड (२४), रमेश गणेश राठोड (२६), शालूबाई गणेश राठोड (५०, तिघे रा.इसाद), शंकर पिराजी निंबाळकर (४५), प्रकाश गंगाधर पवार (१९), सोनू मारोती पवार (२५), प्रकाश संग्राम देवकते (४५, सर्व रा.महातपुरी), बळीराम अर्जून इंगळे (२१, रा.गंगाखेड) हे दहा जण जखमी झाले आहेत. या जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली देशमुख, परिचारिका तक्षशिला वाघमारे, विश्वजीत मठपती, प्रकाश राठोड यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. सुरेश राठोड, शंकर निंबाळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. तर काही जखमींना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.