परभणी : उष्माघाताने चौघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:10 AM2018-05-15T00:10:34+5:302018-05-15T18:41:07+5:30
दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्याचे तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचते़ मागील काही वर्षांचा अनुभव पाहता एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकतो़ यावर्षी दीड महिन्यापासून पारा वाढलेला असून, आजपर्यंत तो कमी झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना हे ऊन असह्य करणारे ठरत आहे़ मागील चार दिवसांमध्ये चौघांचा बळी गेला आहे़ १० मे रोजी सेलू तालुक्यातील खेर्डा बु़ येथील संभाजी सोनवणे या ६५ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला़ जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली़ त्यानंतर ११ मे रोजी डिघोळ येथील ५० वर्षीय सोजरबाई हजारे, १२ मे रोजी सोनपेठ येथील ऐश्वरी धनंजय डहाळे या ६ महिन्यांच्या बालिकेचा आणि १३ मे रोजी बामणी येथील सुदाम नेमाडे या ५२ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. या चारही दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यात ४४ अंश एवढे तापमान होते़ चार दिवसांत चौघांचा उष्णतेमुळे बळी गेल्याने उन्हाची तीव्रता लक्षात येते़ मागील महिनाभरापासून जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सकाळी १० वाजेपासून तापणाऱ्या ऊन्हाची सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीव्रता कायम राहत आहे़ त्यामुळे दिवसभर रस्ते सुनसान पडत आहेत.