परभणी : रखडलेल्या रस्त्याने घेतला एकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:04 AM2018-11-14T00:04:04+5:302018-11-14T00:04:41+5:30
पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
केंद्रीय रस्ता निधीतून वेगवेगळ्या दोन टप्प्यात पूर्णा ते झिरोफाटा या २० कि.मी. अंतराच्या रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्यावरील लक्ष्मीनगर पाटी परिसरात दोन्ही टप्प्यातील अर्ध्या कि.मी.चे काम रखडलेले आहे.
या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. मंगळवारी या रखडलेल्या रस्त्याने एका वाहनचालकाचा बळी घेतला. पूर्णा येथील श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष ढोणे (६८) यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर अॅक्टीव्हा गाडी घेतली होती. या गाडीच्या पासिंगसाठी ते व त्यांची मुलगी कोमल हे दोघे पूर्णेकडून झिरोफाटामार्गे परभणीकडे जात होते.
पूर्णा ते लक्ष्मीनगर पाटी दरम्यान अचानक चांगला रस्ता संपला आणि वेगात असलेली अॅक्टीव्हा रखडलेल्या रस्त्यावर गेली.
त्यामुळे गाडीचा तोल सांभाळू न शकल्याने सुभाष ढोणे यांचा १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अपघात झाला. या अपघातात ढोणे हे जागेवर बेशुद्ध झाले. तर त्यांच्या मुुलीला गंभीर दुखापत झाली. त्याच वेळी परिसरातून जात असलेले पूर्णा येथील मधुकर खराटे, राम भुसारे व ग्रामस्थांनी प्रयत्न करुन त्यांना खाजगी वाहनाने पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले; परंतु, सुभाष ढोणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथील हलविण्याचा सल्ला दिल्ला. नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले असता दुपारी ३ वाजता ढोणे यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांनी रखडलेल्या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती; परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. वेळेत हा रस्ता दुरुस्त झाला असता तर ढोणे यांचा अपघात झाला नसता, अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे. सुभाष ढोणे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.