परभणी: गोदावरीपात्र कोरडे पडल्याने पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांचीही परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:31 AM2019-04-21T00:31:13+5:302019-04-21T00:32:17+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : तालुक्यातील गोदावरीनदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़
पाथरी तालुक्यात अनेक गावांना गोदावरीनदीचा वारसा लाभला आहे़ यावर्षीच्या गंभीर दुष्काळाचा फटका या गावांनाही बसत असून, ढालेगावपासून ते मुदगलपर्यंतचे गोदावरी पात्र कोरडेठाक पडले आहे़ तालुक्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नदीपात्रात पाणी जमा झाले नाही़ तालुक्याचा अर्धाअधिक भाग गोदावरी नदी लगत आहे़ साधारणत: ४५ किमी अंतराचा हा पट्टा नदीकाठी विसावलेला आहे़ मुदगल आणि ढालेगाव असे दोन उच्च पातळी बंधारे असले तरी सद्यस्थितीला मुदगल बंधारा कोरडा असून, ढालेगाव बंधाऱ्यात एक टक्का पाणी शिल्लक आहे़ ढालेगाव बंधाºयाचे पाणी कमी झाल्याने बॅक वॉटर निवळीपर्यंत आले आहे़ या तालुक्यात दोन बंधारे झाल्याने मागील काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे़ मुदगल आणि ढालेगाव बंधाºयाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उसाची लागवड केली; परंतु, नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पिकांना पाणी देताना उत्पादकांची धावपळ होत आहे़ गोदावरी नदीपात्र कोरडे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे़ परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीच एकीकडे भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे पिकांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे़
सद्यस्थितीला गोदावरी नदीपात्रात डबके वजा साचलेल्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न होत आहे़ दिवसभरातून तीन ते चार वेळा विद्युत पंप लावल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत आहे़ या तालुक्यांत पावसाअभावी खरीप, रबी हंगाम तर हातचा गेलाच आहे़; परंतु, आता थोड्याफार पाण्यावर जगविलेले उसाचे पीकही धोक्यात सापडले आहे़ एकंदर गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसह ऊस उत्पादक शेतकºयांचीही परवड सुरू झाली असून, शेतकरी ऊस पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़
जायकवाडीचे पाणी सोडण्याची गरज
गोदावरी नदीचा पट्टा दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत असून, या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज निर्माण झाली आहे़ जायकवाडीचे पाणी मिळाले तरच गोदाकाठच्या ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळू शकतो़