परभणी : ग्रामस्थांनी बंद पाडले पाणीपुरवठा योजनेचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:00 AM2019-11-16T00:00:17+5:302019-11-16T00:00:56+5:30
येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुरु असलेले पाईपलाईनचे काम छोटे पाईप वापरण्यात येत असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास बंद पाडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा (परभणी): येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुरु असलेले पाईपलाईनचे काम छोटे पाईप वापरण्यात येत असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास बंद पाडले.
चारठाणा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. योजनेंतर्गत कान्हा शिवारातील पाझर तलावात दोन विहिरींचे काम पूर्ण झाले असून चारठाणा फाटा येथे एका पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. या टाकीची क्षमता ४१ हजार लिटर असून गावातील पेठविभागात उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या टाकीची क्षमता ७१ हजार लिटर असणार आहे. यावरुन गावातील ३० ते ३५ टक्के भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तसेच गावातील कसबा भागातील ५० ते ५५ टक्के भागासाठी २३ गाव योजनेची जुनी २ लाख लिटर पाणी क्षमता असलेली टाकी उपयोगात राहणार आहे. त्या टाकीला मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या विहिरीतून नवीन पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी देण्यात येणार आहे. या अनुषंगाने चारठाणा टी-पॉर्इंट टाकीवरुन परवीन कॉलनी, पारधीवाडा, संत जनार्दन विद्यालय परिसर, हुतात्मा स्मारक परिसर या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. या भागात दाट लोकवस्ती असल्याने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता येथे अडीच इंची पाईपलाईन देखील कमी पडणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित एजन्सीने याबाबतच्या अंदाजपत्रकाची माहिती ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी होती. शुक्रवारी टी-पाँईट परिसरात कमी जाडीचे पाईप या कामासाठी वापरले जात असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास येथे ग्रामस्थ जमले व त्यांनी हे काम बंद पाडले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद रहेमत अली, अनिस खा पठाण, नसीब खा पठाण, सय्यद रहीम, सय्यद तालेब अली आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. जोपर्यंत या कामाचे अंदाजपत्रक दाखविले जाणार नाही, तोपर्यंत हे काम करु देणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे या कामासाठी आलेले कामगार बसून राहिले. आता ग्रामपंचायत व सदरील कंत्राटदार या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चारठाण्यात होणारी तिसरी पाणीपुरवठा योजना
४चारठाणा येथे यापूर्वी १९७२ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये २३ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी देण्यात आले. ही योजनाही ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरली.
४परिणामी १९७२ च्या योजनेद्वारेच ग्रामस्थांना सध्या पाणीपुरवठा सुरु आहे; परंतु, वाढलेली लोकसंख्या पाहता या योजनेचे पाणीही ग्रामस्थांना पुरेसे होत नाही. त्यामुळे जवळपास साडेचार कोटी रुपये खर्च करुन मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या तिसºया पाणीपुरवठा योजनेतून तरी ग्रामस्थांची तहान भागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.