परभणी : गोदावरी नदी काठावरील गावेही पाणीटंचाईने वेढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:04 AM2019-04-16T00:04:48+5:302019-04-16T00:05:20+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
यावर्षी सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचे वेढले आहे. चार वर्षापासून पाऊस काळ कमी असल्याने यावर्षी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. विहीर, बोअरचे पाणी आटल्याने दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणीटंचाई सामना करावा लागत आहे. यापुढे ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणीटंचाई वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेत शिवारांमध्ये भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात आहे; परंतु, नदीपात्रात पाणी नसल्याने त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. परिणामी गोदाकाठच्या गावांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे यावर्षी सोनपेठ तालुका पाणीटंचाईच्या विळख्याने वेढला असून ग्रामस्थ टंचाईने त्रस्त झाले आहेत.
तालुका प्रशासनाने सुरू केल्या उपाययोजना
४मागील वर्षी तालुक्यात ३० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी देखील अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन या उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.