परभणी : अडीचशेच्यावर ग्रामस्थांनी सोडले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:03 AM2019-05-14T00:03:17+5:302019-05-14T00:24:36+5:30

दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खोकलेवाडी या गावाला बसला असून गावात काम मिळत नसल्याने अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी गाव सोडले आहे. साधारणत: १२०० मतदार असलेल्या या गावातील बहुतांश ग्रामस्थ बाहेरगावी कामाच्या शोधार्थ गेल्याने अनेक घरांना कुलूप लागले आहे. सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ मध्ये ही परिस्थिती दिसून आली.

Parbhani: Villages left the Adivashee village | परभणी : अडीचशेच्यावर ग्रामस्थांनी सोडले गाव

परभणी : अडीचशेच्यावर ग्रामस्थांनी सोडले गाव

Next

अन्वर लिंबेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
खोकलेवाडी (गंगाखेड जि. परभणी) : दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खोकलेवाडी या गावाला बसला असून गावात काम मिळत नसल्याने अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी गाव सोडले आहे. साधारणत: १२०० मतदार असलेल्या या गावातील बहुतांश ग्रामस्थ बाहेरगावी कामाच्या शोधार्थ गेल्याने अनेक घरांना कुलूप लागले आहे. सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ मध्ये ही परिस्थिती दिसून आली.
संपूर्ण गंगाखेड तालुकाच दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत आहे. पाणी आणि चारा टंचाई पाठोपाठ मजुरांचे स्थलांतर हा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या खोकलेवाडी या गावची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी थेट गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा दुष्काळाची दाहकता दिसून आली. साधारणत: २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १२०० मतदार आहेत. तर २०० च्या आसपास कुटुंब संख्या आहे. ८०० मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. सध्या या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप आटले असून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीही तळाला गेले आहे. गावात पिण्यासाठीच पाणी मिळत नसून शेतीचा तर प्रश्नच येत नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत. गावात आणि परिसरात कामेच नसल्याने सुमारे अडीचशेहून अधिक मजुरांनी गाव सोडले असून त्यांनी पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, गंगाखेड शहर आदी ठिकाणी स्थलांतर केल्याचे समोर आले. काही मजुरांच्या घराला चक्क कुलूप लागले असून त्यांचे कुटुंबासह स्थलांतर झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावात शेतीची कामे शिल्लक नाहीत. काही छोटेमोठे व्यवसाय चालतात. मात्र दुष्काळाने हे व्यवसायही डबघाईला आले आहेत. त्यामुळे रोजची गुजरान करण्यासाठी गाव सोडण्याशिवाय पर्याय नसल्याने या गावातून सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. एकीकडे दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन गुंतले असताना मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मात्र ठोस पाऊले उचलली जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
सद्यस्थितीत गावामध्ये महिला, वृद्ध व मुलेच...
४खोकलेवाडी गावाला सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट दिली त्यावेळेस गावातील तरुण व कर्ते व्यक्ती रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र गेल्याचे दिसून आले. गावामध्ये महिला, वृद्ध व लहान मुलेच मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. काही तरुण गंगाखेड येथे दररोज रोजगारासाठी ये-जा करतात. त्यांच्याशी सदरील प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या.
४उन्हाचा कडावा वाढत असताना गावात पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांसाठी चारा नाही, अशातच हातालाही काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव ओसाड पडले आहे. तशी प्रतिक्रिया गावातील पद्ममीनबाई व्यंकटी राजपुंगे, गंगाधर बाबुराव धोंडकर, उत्तम धोंडकर, पार्वतीबाई भानूदास सावंत यांनी दिली. यावेळी त्यांच्या बोलण्यात प्रशासकीय यंत्रणेविषयी संताप दिसून आला. प्रशासनाची उदासिनता या बाबीसाठी कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीमुळे गावात काम शिल्लक नाही. कुटुंबाची गुजरान करणे तर आवश्यक आहे. त्यामुळे कामाच्या शोधात तीनही मुलांनी गाव सोडले आहे. एक हैदराबादला, एक पुण्याला तर एक औरंगाबाद शहरात गेला आहे.
- सुशिलाबाई नामदेव मलगे

गावात काम नसल्याने माझा भाऊ कोंडिबा गवाले यांचे कुटुंब कामासाठी गंगाखेड येथील वीटभट्टीवर गेले आहे. त्यामुळे दुष्काळामुळे मुलीला पालकांपासून दूर रहावे लागत असून या अपंग मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
- धु्रपदबाई भगवान धोंडकर

गावात काम नसल्याने कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन बाहेरगावी जावे लागते. काम कसे शोधावे, असा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यामुळे सध्या तरी गंगाखेड येथील बाजारात जातो. या ठिकाणी दिवसभरात मिळेल त्या कामावर कुटुंबाची गुजरान होते.
- संतोष शंभूदेव खंबाळे

गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच मजुरांना काम मिळत नाही. तेव्हा कृषी विभाग व पंचायत समितीने रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत आणि या गावातून होणारे मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- काशीबाई रमेश होळंबे, सरपंच

Web Title: Parbhani: Villages left the Adivashee village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.