परभणी : विषाणूजन्य तापीचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:16 AM2018-10-24T00:16:42+5:302018-10-24T00:17:18+5:30

साधारणत: एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य आणि विषाणूजन्य तापीचा फैलाव झाला असून, रुग्णांच्या संख्येतही कैक पटीने वाढ होत चालली आहे़ जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय रुग्णांनी फुल्ल झाले असून, आरोग्य विभागाच्या उपाययोजना मात्र तोकड्या पडत असल्याचे दिसत आहे़

Parbhani: Viral virulence | परभणी : विषाणूजन्य तापीचा कहर

परभणी : विषाणूजन्य तापीचा कहर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : साधारणत: एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य आणि विषाणूजन्य तापीचा फैलाव झाला असून, रुग्णांच्या संख्येतही कैक पटीने वाढ होत चालली आहे़ जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय रुग्णांनी फुल्ल झाले असून, आरोग्य विभागाच्या उपाययोजना मात्र तोकड्या पडत असल्याचे दिसत आहे़
वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यामध्ये विषाणूजन्य तापीचा संसर्ग वाढला आहे़ सर्दी, ताप, खोकला या आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ या विषाणूजन्य तापीमध्येच डेंग्यू सदृश्य तापीच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ जिल्ह्यात अनेक रुग्णालयांमध्ये तापीने त्रस्त झालेले रुग्ण उपचार घेत आहेत़ दीड महिन्यापासून तापीच्या संसर्गामुळे जिल्हावासियांना आरोग्याच्या प्रश्नांनी पछाडले आहे़ येथील जिल्हा रुग्णालयामध्ये संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून, हा कक्ष सध्या रुग्णांनी फुल्ल झाला आहे़ महिला, पुरुष रुग्णांसाठी रुग्णालयात वेगवेगळे उपचार कक्ष आहेत़ महिलांच्या कक्षामध्ये सध्या २० ते २२ रुग्ण उपचार घेत आहेत तर पुरुषांच्या कक्षातील तापीच्या रुग्णांची संख्या २५ ते ३० पर्यंत आहे़ मागील आठ दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात तापीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती़ सद्यस्थितीला रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ही संख्या अधिक आहे़ खाजगी दवाखान्यांमध्येही दाखल होणारे सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, ताप आणि खोकल्याचे आहेत़
विषाणूजन्य तापीची साथ जिल्ह्यामध्ये सुरू झाली असून, त्यात डेंग्यू तापीचाही समावेश आहे़ डेंग्यू सदृश्य तापीची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवसांचा कालावधी असलेला हा ताप नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे़ विषाणूजन्य तापीच्या आजारामध्ये प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाणही अधिक असल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी धास्ती घेतली आहे़ तापीची लागण झाल्यानंतर प्लेटलेटस् कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे तापीच्या आजाराबरोबरच प्लेटलेट कमी झालेल्या रुग्णांची संख्याही रुग्णालयांत वाढली आहे़
पाच प्रकारचे : विषाणू सक्रिय
वातावरणातील बदल आणि इतर कारणांमुळे सध्या पाच प्रकारचे विषाणू सक्रिय असून, या विषाणूजन्य तापीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे़ त्यात डेंग्यू, आरएसव्ही, स्वाईन फ्लू, अ‍ॅडिनो व्हायरस आणि रोटा व्हायरस या विषाणूंचा समावेश आहे़ हे सर्व विषाणू तापीच्या आजाराला कारणीभूत ठरतात़ डासांच्या माध्यमातून, हवेतून, पाण्यातून आणि अन्नातून हे विषाणू पसरतात़ तापीच्या रुग्णांमध्ये कोणत्या विषाणुची लागण झाली आहे त्यानुसार उपचार केले जातात़ सर्वसाधारणपणे फुफ्फुसाला त्रास देणारे, मेंदू, यकृत आणि पोटाच्या आजाराचे विषाणू आढळत असल्याची माहिती डॉ़ रामेश्वर नाईक यांनी दिली़

Web Title: Parbhani: Viral virulence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.