परभणी : विसर्जनाला उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:41 AM2018-09-25T00:41:59+5:302018-09-25T00:42:20+5:30
दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.
गणेशोत्सवाच्या काळात १० दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची शहरात रेलचेल होती. रविवारी बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच सुरुवात केली. सायंकाळच्या सुमारास गणेश मंडळ स्थळापासून ढोल-ताशे आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणुकांना प्रारंभ झाला. चार चाकी वाहनांमध्ये आरुढ झालेली गणरायची मूर्ती आणि त्या समोर लेझीम, झांज पथक, टाळ, मृदंगाचा गजर करीत या मिरवणुका शहरातील मुख्य मार्गाने पुढे सरकत होत्या. रात्री ८ वाजेच्या सुमारास देशमुख गल्ली मित्र मंडळाचा गणपती मिरवणूक मार्गावर दाखल झाला. पारंपारिक वेषामध्ये गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यानंतर नारायणचाळ भागातून सुवर्णकार गणेश मंडळाची भव्य मिरवणूक गणेशभक्तांचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीतील ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले. चांदीच्या आवरणाचा रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. त्याच पाठोपाठ बालाजी गणेश मंडळाचा सजीव देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या मिरवणुका गांधी पार्क, शिवाजी चौक येथे दाखल झाल्यानंतर मान्यवरांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. शिवाजी चौकात शिवसेनेच्या मंचावर आ.डॉ.राहुल पाटील यांनी गणेश मंडळ पदाधिकाºयांचे स्वागत केले. गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक या ठिकाणी भाजपाच्या वतीने मंच उभारुन पदाधिकाºयांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी अल्पोहार आणि पाण्याची व्यवस्था केली होती. रात्री १२ वाजेपर्यंत या मिरवणुका चालल्या. त्यानंतर वसमतरोडवरील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेने उभारलेल्या हौदामध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी विनवणी करीत भक्तांनी गणरायाला निरोप दिला.