परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:27 AM2019-06-26T00:27:25+5:302019-06-26T00:28:08+5:30
प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़
परभणी शहरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष इंजिनिरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्टचर, हॉटेल व्यवस्थापन, पॉलिटेक्नीक आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन प्रवेशाचे केंद्र आहे़ मंगळवारी सकाळी ११ पासून येथील इंटरनेट कनेक्शन बंद पडल्याने यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालकांची एकच तारांबळ उडाली़ दिवसभर या संदर्भात प्रयत्न करूनही नेट सुरू झाले नाही़ त्यामुळे पालक, विद्यार्थी ताटकळत बसले होते़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम नांदेडहून असल्याने नेट बंद असल्याचे बीएसएनलएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे येथील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख प्रा़ उत्कर्ष गडदे यांनी सांगितले़ २६ जून हा प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे़ २५ जून रोजी दिवसभर ही प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेवटच्या एका दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातून विद्यार्थी शेवटच्या दिवशी आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करणार असल्याने सदरील सर्व्हरवर लोड येऊ शकतो़ परिणामी प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होवू शकतो, अशी भीती पालकांना वाटू लागली आहे़ त्यामुळे यासाठीच्या कालावधीत वाढ करावी, अशी मागणी पालक- विद्यार्थ्यांमधून होत आहे़
गेल्या आठवड्यातही बंद पडली होती प्रक्रिया
४व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गोंधळाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे़ १८ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील तीन दिवस सर्व्हर डाऊनमुळे बंद पडली होती़ त्यानंतर २४ जूनपासून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्याने अर्ज दाखल केले होते, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागत आहे.
४पूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हित रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुकतांनी दिले आहे.