परभणी : जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून मतदान यंत्रे रात्रीतून पोहचले स्ट्राँग रुममध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:58 PM2019-04-19T23:58:02+5:302019-04-20T00:00:14+5:30
परभणी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मतदान यंत्रे जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये रात्री उशिरापर्यंत आणण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मतदान यंत्रे जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये रात्री उशिरापर्यंत आणण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री मतदान संपल्यानंतर प्रत्येक विधानसभास्तरावर मतदान यंत्र जमा करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून हे मतदान यंत्र आणण्यासाठी जीपीएस यंत्रणा असलेले प्रत्येकी ३ या प्रमाणे १८ कंटेनर उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान यंत्र परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत विधानसभानिहाय ठेवण्यात आले आहेत. यासाठी २५० रॅकची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तीनस्तरावर कडक पोलीस बंदोबस्त २३ मेपर्यंत राहणार आहे. यासाठी सीआरपीएफ आणि एसआरपीएफचे जवान २४ तास कार्यरत राहणार आहेत. स्ट्रा़ँगरुमच्या परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून येथे २४ तास एक नायब तहसीलदार कायमस्वरुपी नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय दिवसातून दोनवेळा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची या स्ट्राँगरुमला भेट राहणार आहे. एखाद्या उमेदवाराला स्ट्राँगरुम परिसरात थांबायचे असल्यास स्ट्राँगरुमच्या बाहेरील बाजुस तशी व्यवस्था निवडणूक विभागातर्फे करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या कंटेनरमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास १८ कंटेनरचा उपयोग करण्यात आला. यासर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच सीआरपीएफच्या सुरक्षा घेºयात ते परभणीत पोहोचवण्यात आले.