परभणी : पालम तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:39 AM2018-03-10T00:39:41+5:302018-03-10T00:39:53+5:30
रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम : रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.
पालम तालुक्यामध्ये मागील ३ ते ४ महिन्यापासून रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. तालुक्यातून सिंचन विहिरीचे ३३६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. तसेच शौचालय बांधकामाचे २७, विहीर पूनर्भरणचे ७४, अंतर्गत रस्त्याचे १८, शेततळ्याची ११ असे ४६६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करुनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. रोहयो अंतर्गतच्या कामांना मान्यता मिळावी, यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील छाननी समितीकडे प्रत्येक बैठकीच्या वेळेस प्रस्ताव घेऊन जात आहेत; परंतु, समितीचे अनेक सदस्य बैठकीला हजर राहत नसल्याने बैठक होत नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ९ मार्च रोजी पंचायत समितीचे कर्मचारी प्रस्ताव घेऊन छाननी समितीकडे गेले झाले होते. परंतु, समितीचे सदस्य बैठकीला हजर नसल्याने सर्व सदस्यांच्या सह्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी यांनी हे प्रस्ताव परत पाठविले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन रोहयोची कामे मार्गी लावावीत, असा आदेशही दिला होता. परंतु, छाननी समितीकडून या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून कामे खोळंबली आहेत. छाननी समिती प्रस्तावांना मंजुरी का देत नाही, या मागचे गौडबंगाल मात्र अजूनही समोर आलेले नाही.
मजुरांचे स्थलांतर
४ पालम तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे तीन महिन्यांपासून ठप्प पडली आहेत. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजूर कामानिमित्त बाहेरगावी जात आहेत. तालुक्यामध्ये रोहयोची कामे उपलब्ध करुन दिल्यास या मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होतील.
पंचायत समितीमध्ये दाखल झालेले प्रस्ताव छाननी समितीपुढे दरमहा ठेवण्यात येत आहेत. परंतु, उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या मजुंरीसाठी अडवणूक करीत आहेत. याचा त्रास आम्हाला होत असून जनतेला तोंड देताना नाकी नऊ येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
-सावित्री आत्माराम सोडनर, सभापती