विजांच्या कडकडाटात परभणीला पावसाने झोडपले; दोन तासात ७४ मिमी पाऊस
By राजन मगरुळकर | Published: September 8, 2022 12:50 PM2022-09-08T12:50:54+5:302022-09-08T12:52:05+5:30
परभणी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नव्हता.
परभणी : शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटात एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास सुरू झालेला पाऊस साडेतीन वाजेपर्यंत सुरू होता. कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार शहरात दोन तासात ७४ मिमी पाऊस झाला.
परभणी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नव्हता. दहा ते पंधरा दिवसात पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे पाऊस पडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनाही लागली होती. बुधवारी मध्यरात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि गडगडाटामध्ये हा पाऊस सुरू झाला. जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, परभणी शहरात या पावसामुळे सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
एका दिवसात ५.६ मिमी पाऊस
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.६ मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये परभणी तालुक्यात १८.४, गंगाखेड शुन्य, पाथरी ७.२, जिंतूर ०.६, पूर्णा तीन, पालम शून्य, सेलू शून्य, सोनपेठ १.९, मानवत तालुक्यात १३.३ पाऊस झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने घेतलेल्या नोंदीनुसार परभणी शहरात गुरुवारी सकाळपर्यंत तब्बल ७४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.