परभणी : फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी केले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:27 AM2019-05-18T00:27:33+5:302019-05-18T00:28:03+5:30
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़
जिंतूर तालुक्यातील शेक येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वत:च्या केळी फळबागाचे पाणी तोडून गावालगतच्या श्रीरामपूर वस्तीतल्या ग्रामस्थांना मोफत पाण्याचे वाटप सुरू केले आहे़ शेक व श्रीरामपूर ग्रुपग्रामपंचायत असून, या गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे पाणी आटल्यामुळे श्रीरामपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत होती़ गावातील हातपंप विहिरी आटल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दोन किमीची पायपीट करून शेतातून पाणी आणावे लागत होते़
ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेऊन येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वत:च्या शेतातील ३ हजार केळीच्या झाडाचे पाणी तोडून ग्रामस्थांना पिण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे़
यामुळे गावातील पाणीटंचाई निवळण्यास हातभार लागला असून पाण्यासाठी भटकंती करणाºया ग्रामस्थांना अशा कडक उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे़ टंचाईग्रस्तांसाठी शेक येथील सरपंच शेख सुलेमान यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे शेक व परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे़
टँकरसाठी दाखल केला प्रस्ताव
४शेक ग्रामपंचायतीच्या वतीने गावालगत असलेल्या श्रीरामपूर वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी जिंतूर तहसीलदाराकडे दिला आहे. हा प्रस्ताव सध्या तरी प्रशासकीय प्रक्रियेत आहे.
४प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब लक्षात सद्यस्थितीला गावात पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे सरपंच शेख सुलेमान यांनी सांगितले. सद्यस्थितीत पाण्याचा प्रश्न काही अंशी शिथील झाला असला तरी टँकरही तातडीने सुरू करावे, अशी मागणी श्रीरामपूर वस्तीतील ग्रामस्थांनी केली आहे.