परभणी : जलशुद्धीकरण यंत्र आठ दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:26 AM2019-04-11T00:26:16+5:302019-04-11T00:26:33+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
पाथरी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांना व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर आणि जलशुद्धीकरण यंत्राची सुविधा एक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आली होती. पंचायत समितीमध्ये विविध योजनांची माहिती व योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे; परंतु, गेल्या आठ दिवसांपासून हे यंत्र किरकोळ दुरुस्तीअभावी बंद असल्याने कर्मचारी व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सर्वांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ते नादुरुस्त झाले आहे. दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले असून दोन दिवसांत हे यंत्र सुरू होईल.
-बी.टी. बायस, बीडीओ,पाथरी