परभणी, पुर्णेचा पाणीप्रश्न :सिद्धेश्वर, दूधनात पाण्याचे आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:25 AM2018-10-25T00:25:55+5:302018-10-25T00:26:34+5:30
परभणी शहराबरोबरच पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी सिद्धेश्वर आणि निम्न दूधना प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे़ निम्न दूधना प्रकल्पात १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये ३० दलघमी पाणी या दोन शहरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहराबरोबरच पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी सिद्धेश्वर आणि निम्न दूधना प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे़ निम्न दूधना प्रकल्पात १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये ३० दलघमी पाणी या दोन शहरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला़
यावर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ आतापासूनच शहरी भागाला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत़ या पार्र्श्वभूमीवर बुधवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिण्याचे पाणी आरक्षणासंदर्भात बैठक झाली़ जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते़ तसेच खा़ बंडू जाधव, आ़ मोहन फड, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची यावेळी उपस्थिती होती़
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली़ टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षत घेऊन आणि पाण्याची गरज ओळखून सर्व गावांमधील पिण्याच्या पाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने करावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या़ पाटबंधारे प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि पाटबंधारे विभागाचे नियोजन याचा आढावाही पाटील यांनी घेतला़ परभणी शहरातील पाण्याचीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दूधना आणि सिद्धेश्वर या दोन प्रकल्पांमध्ये पाणी आरक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ त्यानुसार निम्न दूधना प्रकल्पामध्ये परभणी, पूर्णा शहरासाठी १६ दलघमी आणि सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये या दोन शहरांसाठी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्याचे निश्चित करण्यात आले़ त्याच प्रमाणे जायकवाडी प्रकल्पातून मानवत तालुक्यातील १९ गावे आणि गंगाखेड तालुक्यातील चार गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे़ सेलू शहर आणि परभणी, सेलू व मानवत तालुक्यातील इतर गावांसाठीही निम्न दूधना प्रकल्पात २़८६० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे़ याशिवाय येलदरी, करपरा, मासोळी, ढालेगाव, मुदगल, मुळी, डिग्रस या पाटबंधारे प्रकल्पात, झरी तलावातील पाण्याचेही पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करण्यास या बैठकीस मंजुरी देण्यात आली़ निम्न दूधना प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लवकरात लवकर घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले़ त्याच प्रमाणे मुळी व मोरेगाव बंधाऱ्याला गेट बसण्याच्या कामाला गती देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या़ या बैठकीत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दिली़ निम्न दूधना प्रकल्पात १७़१८० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने बंधाºयातील पाण्याची स्थिती कमी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़
भारनियमन कमी करा : गुलाबराव पाटील
परभणी शहरातील काही भागांत महावितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन केले जात आहे़ ९ तासापर्यंत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शासकीय कार्यालयांतील कामकाज व नागरिकांची कामेही खोळंबत आहेत़ परभणी शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. ९ तासांपर्यंत भारनियमन होत असल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कामकाजातही अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी शहरात जास्तीचे भारनियमन करु नये, शहरासाठी अखंडीत वीजपुरवठा द्यावा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन व वीजपुरवठ्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.