परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:01 AM2019-02-02T01:01:29+5:302019-02-02T01:01:50+5:30
गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
पाथरी तालुक्यातील बहुतांश भाग हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकºयांच्या हातची गेली आहेत.
रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आल्याने थोड्याफार प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र त्यानंतर ज्वारी, हरभरा, गहू आणि ऊस या पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे पाथरी तालुक्यात रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक दिवासांपासून शेतकºयांकडून करण्यात येत होती. स्थानिक आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाणी सोडावे, असा अग्रह धरला होता.
मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी एक पाणीपाळी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २३ जानेवारी रोजी धरणातून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या मुख्य कालव्यात कमी वेगाने पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची गती संथ राहिली. त्यातच १ फेब्रुवारी रोजी जायकवाडी धरणाच्या मुुख्य कालव्यात देवनांद्रा जवळ ४४६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
सध्या पाथरी उपविभागात शाखा कालवा बी-५९ हातगाव वितरिकेवर १५२ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाथरी आणि मानवत तालुक्यातील ६ शाखांमध्ये ३ हजार ५०० हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यातच हे पाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व उसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पाणीपातळीतही होणार वाढ
पाथरी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे बहुतांश गावातील विहीर, बोअर, हातपंप कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाला स्त्रोतांचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे; परंतु, पाटबंधारे विभागाच्या वतीने जायकवाडी धरणाच्या मुख्य कालव्यात ४४६ क्युसेसने पाणी सोडले आहे. हे पाणी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास एक महिना राहणार आहे.
४या कालव्याच्या पाण्यामुळे शेतातील सिंचन विहिरींसह गाव परिसरातील जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जायकवाडीच्या या पाण्यामुळे काही अंशी सिंचनाबरोबरच पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाथरी भागात दाखल झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पाळी सुरू राहणार आहे.
-दिवाकर खारकर, उपअभियंता जायकवाडी, पाथरी