परभणी : येलदरीतून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:41 PM2019-01-15T23:41:25+5:302019-01-15T23:41:42+5:30
येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.
येलदरी धरणात २०१८ च्या पावसाळ्यात केवळ ९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. यातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या गेटमधून ३१ डिसेंबर २०१८ रोजी पाणी सोडण्यात आले होते. विद्युत केंद्रातील दरवाजामधून उपयुक्त पाणीसाठ्यातून ६० दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतरही जलसंपदा विभागाने १४ जानेवारी रोजी दुपारी सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले आहे. या दरवाज्यातून साधारणत: २ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी किती दिवस सोडले जाणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. येलदरी धरणाची एकूण उपयुक्त पाणी साठवणूक क्षमता ही ८१० दलघमी आहे. तर १२४ दलघमी एवढी मृत पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी यावर्षी केवळ एकूण क्षमतेच्या ९ टक्के एवढेच उपयुक्त पाणी धरणात नव्याने आले होते. हे पाणी १४ दिवसांमध्ये सोडण्यात आले. आता धरणात केवळ १२४ दलघमी एवढा मृत पाणीसाठा आहे. यातूनही पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिल्याने मंगळवारपासून येलदरी धरणातील मृत पाणीसाठाही सोडण्यात येत आहे. त्यामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यावर पाण्याचे संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
धरणात १४ टक्के गाळ
धरणाच्या एकूण क्षमतेच्या १४ टक्के गाळ धरणात असल्याचा अहवाल २००९ साली मेरीटेक या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आला होता. हे सर्वेक्षण होऊन जवळपास १० वर्षे उलटली आहेत. त्यामुळे गाळात नक्कीच वाढ झाली आहे. या परिस्थितीत प्रशासन कोणत्या आकडेवारीनुसार येलदरी धरणातील पाण्याचे गणित मांडत आहे, हे सांगणे कठीणच आहे. जलसंपदा विभागाच्या या गलथान कारभारामुळे येणाऱ्या काळात पाणीपुरवठा योजनांसह जिंतूर शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.