परभणी : शहरात पाण्याच्या विक्रीत दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:07 AM2019-02-18T00:07:23+5:302019-02-18T00:07:41+5:30
जिल्ह्यासह परभणी शहरात पाण्याच्या विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, शहरातील व्यावसायिकांनीही उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरामध्ये पाणी व्यवसायातून दररोज सुमारे ३ लाख रुपयांची उलाढाल होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यासह परभणी शहरात पाण्याच्या विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, शहरातील व्यावसायिकांनीही उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरामध्ये पाणी व्यवसायातून दररोज सुमारे ३ लाख रुपयांची उलाढाल होत आहे़
परभणी शहरात दरवर्षी उन्हाळ्यात विकतच्या पाण्याचा व्यवसाय तेजीत असतो़ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नियमित पाणी मिळत नसल्याने आणि भूजल पातळीत घट होत असल्याने नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागते़ ही दरवर्षी निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन व्यावसायिकही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी करतात़ यावर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ तयामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईचे वेध लागले होते़ मात्र मध्यंतरीच्या काळात थंडी वाढल्याने नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही़ आठवडाभरापासून ऊन वाढत चालले असून, आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे़ तसेच शहरातील हातपंपाची पाणी पातळी घटत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ महानगरपालिकेच्या नळ योजनेद्वारे १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, मिळालेले पाणी १५ दिवस पुरविणे शक्य नसल्याने नाईलाजाने पाणी विकत घ्यावे लागते़
शहरामध्ये सुमारे १५० पाण्याचे प्लँट आहेत़ या व्यावसायिकांकडे सरासरी १०० ग्राहक आहेत़ या ग्राहकांना दररोज २० लिटर पाण्याची एक बाटली लागते़ २० रुपयांना या बॉटलची विक्री होत असून, या माध्यमातून दिवसाकाठी सुमारे ३ लाख रुपयांची उलाढाल होत आहे़ आतापर्यंत या व्यावसायिकांकडे पाण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या निम्म्यावर होती़ मात्र मागील आठवडाभरापासून जारचे पाणी मागणी करणारे ग्राहक वाढले आहेत़
उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, जून महिन्यापर्यंत नागरिकांना पाणी प्रश्न सतावणार आहे़ या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी देखील तयारी सुरू केली आहे़ त्यामुळे येत्या काळामध्ये पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे़
रेल्वेस्थानकावर पाण्याची विक्री
४विकतच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरातील रेल्वेस्थानक परिसरातही लघु व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जारचे पाणी उपलब्ध करून दिले आहे़ स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर बसून हे व्यावसायिक पाण्याची विक्री करतात़ थंड पाण्याचे २० लिटरचे एक कॅन ३० रुपयांना विक्री होते़ स्थानक परिसरामध्ये १ लिटरची बाटली ५ रुपयांना विक्री केली जात आहे़
४एका कॅनमध्ये साधारणत: १८ ते २० बाटल्यांची विक्री होते़ यातून या कॅनमागे १० ते २० रुपयांचा नफा हे व्यावसायिक कमावतात़ सद्यस्थितीला दिवसाकाठी २० लिटरच्या सहा कॅन विक्री होत असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले़ आगामी काळात या विक्रीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
वाहन, कर्मचाºयांची वाढविली संख्या
विकतच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यावसायिकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत वेळेत पाण्याचे जार पोहचविण्यासाठी वाहनांची संख्या वाढविली आहे़ तसेच अतिरिक्त कर्मचाºयांचीही नियुक्ती केली आहे़ त्याचप्रमाणे पाणी भरण्यासाठी लागणाºया जारचीही खरेदी सुरू केली आहे़