परभणी : पालम तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:59 PM2019-03-27T23:59:27+5:302019-03-27T23:59:34+5:30
तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे.
पालम तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदी-नाले खळखळून वाहिले नाहीत. तसेच डिग्रस बंधाऱ्यातील पाणी जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे डिसेंबर महिन्यातच सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यात आतापर्यंत ८ गावात जलस्त्रोताचे अधिग्रहण करून चार टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मार्च महिना संपत येताच पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे.
दिवसेंदिवस पाणी स्रोत अधिग्रहणाची मागणी वाढू लागली आहे. पंचायत समितीकडे सद्य स्थितीत ४६ पाणी स्तोत्रांचे अधिग्रहण करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दाखल केले आहेत. तर ११ प्रस्ताव यापूर्वीच गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील झारीतील शुक्राचार्य मात्र अधिग्रहणाच्या प्रस्तावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही तातडीने अधिग्रहणाच्या मंजुरीचे आदेश दिले जात नाहीत. त्यामुळे सरपंच अडचणीत सापडले आहेत. पंचायत समितीकडे तातडीने प्रस्ताव दाखल करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. मागील वर्षीही उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांंना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील बनले होते. या कामासाठी विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी देताना टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
१० बोअरचे अधिग्रहण
४सोनपेठ- तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटी अनेक गावात पाणीप्रश्न निर्माण झाला असून दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यासाठी तालुक्यात दहा बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
४यावर्षी परतीच्या पावसाने गुंगारा दिल्याने अनेक गावांतील जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गांवात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते.
४त्यावरून पंचायत समितीने तालुक्यातील शेळगाव येथे ४, उंदरवाडी येथे २, तिवठाणा २, वैतागवाडी १, वंदन १ अशा एकूण १० बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.