परभणी : साडेचारशे गावांना पाणीटंचाईचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:19 AM2018-11-26T00:19:28+5:302018-11-26T00:19:58+5:30
जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
जिल्ह्यामध्ये यापूर्वीच्या हंगामात पावसाची सरासरी कमी असली तरी संपूर्ण हंगामात पाऊसच झाला नाही, अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली नव्हती़ परंतु, यावर्षी परतीचा पाऊस झालाच नाही़ सुरुवातीच्या काळात झालेल्या कमी अधिक पावसावरच प्रकल्पांमधील जलसाठ्यात पाणी जमा झाले आहे़ त्यामुळे उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे़ आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही़ उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे़ या कारणांमुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे़ जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विभागाने आॅक्टोबर ते जून या महिन्यापर्यंत पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या संभाव्य गावांची माहिती नुकतीच जिल्हा प्रशासनाला दिली आहे़ या माहितीच्या आधारे सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना संदर्भात प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे़
भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये ३३ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण होवू शकते़ त्यात पाथरी तालुक्यातील ११ आणि सेलू तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे़ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या १४१ पर्यंत पोहचू शकते़ त्यामध्ये सेलू तालुक्यातील २०, गंगाखेड तालुक्यातील ५९, सोनपेठ ३४ आणि जिंतूर तालुक्यातील २८ गावांचा समावेश आहे़ तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात आणखी २९४ गावांची टंचाईग्रस्त गावांमध्ये भर पडण्याची शक्यता या विभागाने वर्तविली आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३५, पूर्णा ३३, सेलू १८, मानवत ४९, पालम ६३ आणि जिंतूर तालुक्यातील १०४ गावांचा समावेश आहे़
एकंदर आॅक्टोबर महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या ४६८ एवढी होण्याची शक्यताही या विभागाने वर्तविली आहे़ त्यामुळे परभणी तालुक्यातील ३५, पूर्णा ३३, पाथरी १९, सेलू ६०, मानवत ४१, गंगाखेड ५९, पालम ६३, सोनपेठ ३४ आणि जिंतूर तालुक्यातील १३२ गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़
परभणी जिल्ह्यात सुमारे ८०४ गावे आहेत़ त्यापैकी ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे़ ही बाब लक्षात घेता यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटीेने वाढली आहे़
जिल्हा प्रशासनाला या गावांमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई थांबविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे़ प्रशासनाचे टंचाई कृती आराखडे तयार असले तरी सुक्ष्म नियोजन करून प्रत्यक्ष टंचाईग्रस्त गावांना लाभ देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे़
पाणी उपसा थांबवा
जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे़ असे असतानाही अनेक भागांत या पाण्याचा अवैध उपसा होत असून, हा उपसा थांबविण्यासाठी अधिकाºयांचे प्रयत्न कमी पडत आहेत़ जिल्ह्यात पथकांची स्थापना करण्यात आली असली तरी तलावांमधील पाण्याचा उपसा पूर्णत: थांबलेला नाही़ अवैध पाणी उपसा थांबविला तर उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस वापरणे शक्य होणार आहे़
टंचाई निवारणालाच प्राधान्य देण्याच्या सूचना
जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाची कामे हाती घेतली आहेत. जिल्हास्तरावर बैठकाही पार पडल्या़ या बैठकांमध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकाºयांना टंचाईच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत़ सध्या जिल्ह्यामध्ये अनेक भागांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ काही गावांतील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे़ येथून पुढे परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याने प्रशासनाने आतापासूनच या कामांना प्राधान्य देऊन टंचाईग्रस्त गावांत पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे़
टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार
४भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील ४६८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे़ या विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भूजल पातळीची नोंद घेऊन ही शक्यता वर्तविली आहे़ याशिवाय जिल्ह्यामध्ये इतर मार्गानेही पाणीटंचाई निर्माण होवू शकते़
४त्यात ज्या प्रकल्पावर पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे, त्या प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो़ तसेच पाणी पुरवठा करणाºया योजनेतील त्रुटी, जलवाहिनी नादुरुस्त असणे आदी कारणांमुळेही टंचाईची परिस्थिती निर्माण होवू श्कते़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी मागविली आहे़
४परंतु, अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेने अशा गावांची यादी प्रशासनाला उपलब्ध करून दिली नाही़ त्यामुळे कृत्रिम कारणास्तव टंचाई निर्माण झालेल्या गावांत उपाययोजना करताना प्रशासनाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे़ त्यामुळे संभाव्य टंचाईग्रस्त गावांची माहिती वेळेत देणे गरजेचे झाले आहे.