परभणी :दहा रुपयांना मिळतोय पाण्याचा हंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:03 AM2019-05-18T00:03:31+5:302019-05-18T00:03:53+5:30
तालुक्यातील वालूर गावाला टंचाईचा वेढा पडला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी विक्रेत्यांची मात्र चांदी होत आहे. दुष्काळात त्रासलेल्या वालूरकरांना या पाणी विक्रेत्यांकडून १० रुपयांना हंडाभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून विकतच्या पाण्यावर वालूरकरांची भिस्त असल्याने टंचाईबरोबरच आर्थिक झळाही गावकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : तालुक्यातील वालूर गावाला टंचाईचा वेढा पडला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी विक्रेत्यांची मात्र चांदी होत आहे. दुष्काळात त्रासलेल्या वालूरकरांना या पाणी विक्रेत्यांकडून १० रुपयांना हंडाभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून विकतच्या पाण्यावर वालूरकरांची भिस्त असल्याने टंचाईबरोबरच आर्थिक झळाही गावकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत.
सेलू तालुक्यात ग्रामीण भागात सहा महिन्यांपासून पाणीटंचाई तीव्र झाली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या दररोज वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईचा ग्राऊंड लेव्हल रिपोर्ट घेण्यासाठी या प्रतिनिधीने टंचाईग्रस्त वालूर गावाला भेट दिली. त्यावेळी टंचाईचे विदारक चित्र दिसून आले.
सेलू तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वालूर या गावाची लोकसंख्या १५ ते १७ हजार एवढी आहे. दुष्काळी परिस्थितीने गावातील पाण्याची पातळी खालावली. विंधन विहिरींसह पाणीपुरवठा करणाºया विहिरी, हातपंप कोरडेठाक पडले. त्यामुळे तीन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वास्तविक गावाची लोकसंख्या लक्षात घेता यापूर्वीच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र स्थानिक राजकारणात वालूरकर पाणीटंचाईने होरपळत आहेत. या गावाचा १६ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेश होता. मात्र या योजनेतून थेंबभरही पाणी मिळाले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. एकीकडे पाण्याची टंचाई वाढली असताना दुसरीकडे या टंचाईची संधी साधत विक्रेत्यांनी पाण्याचा बाजार मांडला आहे. सध्या गावात हंडाभर पाण्यासाठी १० रुपये मोजावे लागत आहेत. गावाच्या परिसरात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने दूर अंतरावरुन पाणी आणावे लागते. त्यात महिलांचा अर्धा दिवस पाणी भरण्यासाठी जात आहे.
प्रशासनाने सुरुवातीला १२ हजार लिटर टँकरच्या दोन खेपा आणि त्यानंतर काही दिवस चार खेपा करुन पाणीपुरवठा करणाºया विहिरीत सोडले. त्यातच रस्त्याअभावी अनेक दिवस टँकर बंद होते. अजूनही टँकरचे नियोजन सुरळीत झाले नाही. परिणामी काही भागात ८ दिवसांना पाणी सोडले जाते.
१०० ते दीडशे लिटर पाणी गावकऱ्यांना मिळते. हेच पाणी आठ दिवस पुरवावे लागत आहे. तर ३०० रुपयांना १ हजार लिटर आणि ३ हजार लिटरच्या टँकरला १२०० रुपये मोजावे लागत आहे. गोरगरीब, कष्टकरी नागरिक पाणी विकत घेऊ शकत नाहीत. जे पैसे उपलब्ध होतील, त्या प्रमाणे विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
दुधना नदी काठावर पाणीपुरवठा करणारी विहीर आणि पंप हाऊस आहे. ही योजना कालबाह्य झाल्याची स्थिती आहे. केवळ दोन तास मोटार चालते. तेच पाणी गावाजवळच्या विहिरीत सोडले जाते. मात्र संपूर्ण गावाची तहान भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गावकºयांना विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
घरकुल : बांधकामांनाही बसतोय फटका
४पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका घरकुल बांधकामांना बसला आहे. मोलमजुरी करुन जमवलेल्या पैशांतून लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करावे लागत असल्याचे पाहणीत दिसून आले; परंतु, पाणीटंचाईमुळे या बांधकामांनाही फटका बसला आहे.
४काही महिन्यांपूर्वी वाळू टंचाईमुळे घरकुलांचे बांधकाम बंद होते. वाळू खुली झाली तर पाणी मिळत नाही. प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला असला तरी वालूर गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन कमी पडल्याचे दिसत आहे.
लोकवर्गणीतून उपसला गाळ
४गावातील कानाड गल्लीत सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील एका जुन्या आडातील गाळ उपसण्याचे काम गुरुवारी करण्यात आले.
४लोकवर्गणी जमा करुन ग्रामस्थांनी गाळ उपसला आहे. आता या विहिरीतून किमान ५-६ हंडे पाणी मिळेल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
अर्धा दिवस पाणी भरण्यात घालवावा लागतो. विकतचे पाणी घेणे आमच्या सारख्यांना शक्य नाही. त्यामुळे २०-२० रुपये जमा करुन कानाड गल्लीतील विहिरीत असलेला गाळ, केरकचरा काढून घेतला आहे. या विहिरीच्या पाण्यावरच आता आमच्या आशा लागल्या आहेत. सध्या तरी गावात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी हंडा घेऊन फिरावे लागते.
- गोदावरी खिरडकर
वालूर गावाची लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आवश्यक आहे. सध्या टँकरचे पाणी विहिरीत सोडून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेगवेगळ्या भागात व्हॉल्वच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही, अशा भागासाठी प्रशासनाकडे आणखी एका टँकरची मागणी केली आहे.
- संजय साडेगावकर, सरपंच
गावात तीन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेद्वारे कधी तरी पाणी येते; परंतु, मुख्य रस्त्यावरील घरापर्यंतच हे पाणी मिळते. आमच्या सारख्यांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे दररोज शेतातून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये दिवसभरातील अर्धावेळ पाण्यासाठी घालवावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करावी.
- रमेश जवळकर
तीन महिन्यांपासून गावात पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतीने अगोदरच नियोजन करुन उपाययोजना करणे अपेक्षित होते. अधिग्रहण, टँकरसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे लवकर दिली असती तर उपाययोजना करण्यास मदत झाली असती. टँकरच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पाणी मिळावे, यासाठी ग्रा.पं.ला पूर्ण मदत असेल.
- राजेंद्र लहाने, जि.प.सदस्य