परभणी : पूर्णा शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:32 AM2019-02-03T00:32:13+5:302019-02-03T00:32:39+5:30
तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
शहराला डिसेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी येलदरी जलाशयातून ०.५ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. पूर्णा बंधाºयापर्यंत हे पाणी पूर्ण क्षमतेने पोंहचले नाही. शिवाय या पाणलोट क्षेत्रातून कृषीपंपद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. त्याचबरोबर बंधारा नादुरुस्त असल्याने पाण्याचा दरवेळी मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मागील महिन्यात आलेले पाणी पूर्णपणे संपले आहे. मागील दहा दिवसांपासून पूर्णा शहरातील नागरिक पाणी टंचाईस तोड देत आहेत. उन्हाळा सुरू होण्यास बराच अवधी असताना शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पूर्णा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा परिसरात खोलगट भागात काही प्रमाणात पाणी साठा साचतो, जो नगरपालिकेच्या पंपापर्यंत पोहचू शकत नाही. या खोलगट भागातील पाणी उपसा करणाºया पंपापर्यंत पोहचविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जेसीबी मशीनद्वारे नाला काढण्यात आला आहे. गुरुवारी या कामास सुरुवात झाली असून पाणी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु हे पाणी केवळ आठवडाभरापर्यंत पुरणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाण्याची मागणी करण्यात आली असून पाणी पुरवठ्यासाठी १ दलघमी पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. पाण्यासाठी न.प.प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी ते तोडके पडत आहेत. १ फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागात नळाला पाणी आले आहे; परंतु, अजूनही नवीन वसाहती पर्यंत हे पाणी पोहचू शकले नाही. पाण्याअभावी अतिरिक्त पाणी पुरवठा करणाºया यंत्रणा ही बंद पडल्या आहेत.
हातपंपाची : पाणीपातळी घटली
शहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी हातपंप आहेत; परंतु, यातील काही हातपंप दुरुस्ती अभावी नादुरुस्त आहेत. तर बहुतांश हातपपांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा, पाण्याचा अवैध उपसा या बाबीमुळे पूर्णा शहराला वारंवार पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.