परभणी : गोदाकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:04 AM2019-03-16T00:04:27+5:302019-03-16T00:04:56+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यातील गोदावरीनदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मूबलक पाणीसाठा होता; परंतु, या पाणीसाठ्यातून नांदेडसाठी २० दलघमी पाणी सोडून देण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातच पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठा हळुहळू कमी होण्यास सुरुवात झाली होती. नांंदेडला पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदीच्या काठावरील गावातील पिण्याच्या पाण्याची अजिबात दखल घेतली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकावे लागणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात पाणीसाठा असूनही जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गोदाकाठच्या गावांना आता पाणीटंचाई भासू लागली आहे. गोदावरीच्या पात्रातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारातील अधिग्रहित पाणीसाठ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. गोदावरी नदीचे पात्र जागोजागी उघडे पडले आहे. यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठीही पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. नांदेड शहराला पिण्यासाठी पाणी लागते तर गोदाकाठच्या गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.