परभणी : शंभर टँकरने होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:28 AM2018-10-31T00:28:06+5:302018-10-31T00:29:06+5:30

जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच टँकरसाठी निविदा मागवाव्या लागत असल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.

Parbhani: Water supply to 100 tankers will be done | परभणी : शंभर टँकरने होणार पाणीपुरवठा

परभणी : शंभर टँकरने होणार पाणीपुरवठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच टँकरसाठी निविदा मागवाव्या लागत असल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे परिस्थिती अधिकच नाजूक झाली आहे. एकीकडे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले, रबी हंगामात पेरण्या झाल्या नाहीत तर दुसरीकडे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळ्यातील दोन महिने पाऊस नसल्याने भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाई भासत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे आरक्षण केले आहे. या पाणी आरक्षणातून शहरी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईची परिस्थिती गंभीर नसली तरी आगामी काळात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. सोमवारी ही निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
टँकर मालकांकडून १६ नोव्हेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून, १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या निविदांची छाननी केली जाणार असून, २० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठ्यासाठी टँकर लावण्यासंदर्भातील निविदा अंतिम केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी हालचाली केल्या जातात. मात्र यावर्षी परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने आॅक्टोबर महिन्यातच टँकर सुरू करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
जानेवारीपासूनच लागेल टँकर
४जिल्ह्यात सध्या प्रकल्पातील पाणीसाठा आणि इतर स्त्रोत व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांपर्यंत हे पाणी पुरेल. मात्र जानेवारी महिन्यात जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. हे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच टँकरचे नियोजन आखले आहे. १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन टँकरसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक टँकर
४जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी २०१५-१६ मध्ये २९४ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागला होता. तसेच २०१०-११ मध्ये ६, २०११-१२ मध्ये २३, २०१२-१३ मध्ये ३९, २०१४-१५ मध्ये २४, २०१५-१६ मध्ये २९४, २०१६-१७ मध्ये ३६ आणि २०१७-१८ मध्ये ४६ टँकरने ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी टँकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
परभणी जिल्ह्यात मागील वर्षीही उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची टंचाई अधिक भासण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यासाठी साधारणत: १ कोटी रुपये प्रशासनाला खर्च करावे लागले. यावर्षी १०० टँकर लावावे लागणार असून, त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे टँकरमुक्त गाव ही संकल्पनाही मागे पडू लागली आहे. परिणामी पाणी टंचाईतही भर पडू लागली आहे.

Web Title: Parbhani: Water supply to 100 tankers will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.