परभणी : टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:44 AM2019-06-22T00:44:01+5:302019-06-22T00:44:29+5:30
शहरात महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कालबाह्य झालेल्या वाहनातून पाणी वितरित करण्यात येणाºया एकाही टँकरला जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :शहरात महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कालबाह्य झालेल्या वाहनातून पाणी वितरित करण्यात येणाºया एकाही टँकरला जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले.
परभणी शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया राहटी बंधाºयात मूबलक पाणी असतानाही केवळ अंतर्गत वितरण व्यवस्थमुळे शहरवासियांना तब्बल १७ ते १८ दिवसांतून एकवेळा पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. शहरात मनपाच्या वतीने ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी मनपाचे टँकर शहरातील विशिष्ट भागातच जातात. सर्व समावेशक पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या संदर्भातील तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या. त्यानंतर सत्यता पडताळण्यासाठी शहरातील मनपाच्या एमआयडीसी भागातील टँकरसाठी पाणी वितरणासाठी बनविण्यात आलेल्या पाँर्इंटची शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास पाहणी केली असता कागदावरील स्थिती आणि प्रत्यक्ष ठिकाणावरील स्थिती यात मोठा फरक दिसून आला. यावेळी एम.एच.२६- एच- ६७०२ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या लोखंडी टाकीमध्ये पाणी भरणे सुरु होते. वरील पाईपमधून जेवढे पाणी पडत होते, त्याच्या जवळपास २० टक्के पाणी या लोखंडी टाकीतून गळती होताना दिसून आले. या शिवाय येथे एम.एच. २२-५८, एम.एच.१२-बीए ७२०४, एम.एच.२६-एच ५८३७, एम.एच.२२- आर.२०४० हे ट्रक ज्यामध्ये लोखंडी टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. तर एम.एच.२५-बी.६१२५ व एम.एच.१९-१५७६ हे दोन टेंपो उभे होते. या दोन्ही टेंपोमध्येही पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व वाहनांची पाहणी केली असता एकाही वाहनाला मनपाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदेतील अट क्रमांक ४ नुसार जीपीएस यंत्रणा बसविलेली आढळलेली नाही. शिवाय एकाही वाहनावर किंवा वाहनातील लोखंडी टाक्यावर महानगरपालिकेचे नाव नव्हते किंवा मनपाच्या वतीने पाणी पुरवठा करणारे वाहन असा उल्लेख असणारी साधी पट्टीही लावण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मनपाच्या पाँर्इंटवरुन पाणी घेऊन जाणारे वाहन खरोखरच नागरिकांना देण्यासाठी जात आहे की, खाजगी व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी पाणी घेऊन जात आहे, याचा सर्वसामान्य नागरिकांना बोध होत नव्हता. येथे मनपाचे दोन कर्मचारी नागरिकांच्या गराड्यात बसलेले आढळून आले. यावेळी त्यांच्याकडे सदरील टँकर शहरातील विविध भागामध्ये कशा पद्धतीने पाठविले जातात, अशी विचारणा केली असता त्यांनी नगरसेवकांनी पाँर्इंट दिले आहेत, (मनपा प्रशासनाने नव्हे ) त्यानुसार आम्ही तेथे पाणी पाठवून देतो.
दिवसभरात एका नगरसेवकाच्या सांगण्यावरुन एका टँकरचे ५ ते ६ फेºया केल्या जातात, असे या कर्मचाºयाने सांगितले. उपस्थित एकाही वाहनावर महानगरपालिकेचे नाव नाही, अशी विचारणा केली असता, पोस्टर लावले होते, निघून गेले असे उत्तर दिले. येथे एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी मोंढा पोलीस ठाण्याची पोलीस जीपही येऊन गेली. या पाँर्इंटवर मनपा कर्मचाऱ्यांना ज्या नागरिकांनी गराडा घातला होता, त्यापैकी काही जणांशी संवाद साधला. त्यापैकी अनुसयानगर भागातील नागरिक संजू बोखारे म्हणाले की, ८ दिवसांपासून आमच्या भागात टँकर पाठवून द्या म्हणून येथे येत आहे; परंतु, टँकर दिले जात नाही. सकाळीच एका नगरसेवकाने ७ ते ८ टँकर आपल्या प्रभागात नेले. राम गिरी या खानापूर भागातील नागरिकानेही येथे पाण्यासाठी अनेक दिवसांपासून येत आहे; परंतु, दाद दिली जात नाही, असे सांगितले. रविराज पार्क भागातील नागरिक शिरीष डोंगरे यांनी गेल्या तीन दिवसांपासून या भागात येत आहे; परंतु, पाणी मिळत नाही. शिवाय दखलही घेतली जात नाही, असे सांगितले. उपस्थित मनपा कर्मचाºयांच्या रजिस्टरची पाहणी केली असता, त्यामध्ये कोणत्या व्यक्तीने शिफारस केली आणि कोठे पाणी ट्रिप द्यायची आहे, या बाबतची नोंद होती. प्रभाग समिती अ, ब आणि क मधील विविध भागांना या पाँर्इंटवरुन ४१ टँकरच्या माध्यमातून पाणी देत असल्याचे येथील कर्मचाºयाने सांगितले. त्यानंतर शहरातील ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीला भेट दिली. त्यावेळी एम.एच.२६-एच ५०४७ या क्रमांकाचा टेंपोमधील लोखंडी टाकीत पाणी भरणे सुरु होते. येथील कर्मचाºयाला याबाबत विचारणा केली असता या पाँर्इंटवरुन फारसे पाणी दिले जात नाही. मनपाची वाहने आणि धार्मिक स्थळांसाठी पाणी दिले जाते, असे सांगितले. त्यानंतर शहरातील झाडांना पाणी टाकण्यासाठी असलेला मनपाचा एक टँकर येथे आला. येथे मोठी वाहने दिसून आली नाहीत. असे असले तरी या टाकीवरुन पाणी घेऊन जाण्यास सध्या बंदी घालण्यात आली आहे. तरीही एक खाजगी टेंपो टँकर येथे पाणी नेताना दिसून आला. त्यामुळे मनपाच्या अधिकाºयांची पाणी वितरण व्यवस्थेवर किती नियंत्रण आहे, हे दिसून आले. विशेष म्हणजे टँकरच्या पाणी वितरणाचे पाँर्इंट, प्रत्येक वाहनावर नाव, प्रत्येक वाहनाला जीपीएस यंत्रणा बसविणे, संबंधित वाहनासोबत मनपा कर्मचारी पाठविणे असा कोणताही प्रकार येथे दिसून आला नाही. शिवाय कोणत्या पाँर्इंटवर पाण्याचा टँकर द्यायचा, हे थेट कर्मचाºयांना नगरसेवक कसे काय सांगू शकतात, प्रशासकीय अधिकारी काय करतात, असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
निविदेतील : अटींना दिला खो
४महानगरपालिकेने मंजूर केलेल्या निविदेमध्ये ज्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ते टँकर आरटीओच्या नियमाप्रमाणे कार्यरत असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात येथील काही वाहने कालबाह्य झाल्याचे दिसून आले. सदरील वाहनांचा क्रमांकाची पडताळणी आरटीओच्या अॅपवर केली असता त्यांचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध होत नव्हते.
४शिवाय प्रत्यक्ष पाहणीनंतर संबंधित वाहनांची अवस्थाही कालबाह्य झाल्याचेच दर्शवित होती. शिवाय पुरवठा करण्यात येणारे टँकर निविदेत नमूद केल्या प्रमाणे पूर्ण क्षमतेचे व सुस्थितीत असणे आवश्यक होते; परंतु, प्रत्यक्षात मात्र येथे फुटलेले व त्यातून पाणी गळत असलेले टँकर दिसून आले.
सायंकाळी ७ वाजता नगरसेवक, नागरिकांनी पकडला टँकर
४शहरातील ममता कॉलनी भागात सायंकाळी ७ वाजता पाणी घेऊन जाणारा टँकर नगरसेविका वनमाला देशमुख, अक्षय देशमुख, विश्वजीत बुधवंत व अन्य नागरिकांनी अडवला. यावेळी टँकरचालकाकडे विचारणा केली असता त्याने मोची गल्ली भागात टँकर नेत असल्याचे सांगितले. त्या भागातील प्रमुख नागरिकांशी चर्चा केली असता कोणीही टँकर मागविला नसल्याचे समजले.
४ त्यानंतर मनपाच्या अधिकाºयांना कळविण्यात आले; परंतु, कोणीही घटनास्थळी आले नाही. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी अक्षय देशमुख यांनी संपर्क साधला. त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रात्री ९.१५ वाजता आयुक्त रमेश पवार घटनास्थळी आले. त्यांनी संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर टँकर सोडून देण्यात आला.
रात्रीस खेळ चाले...
४मनपाच्या प्रशासनाच्या वतीने प्रत्येक टँकरला दररोज १२ तास व किमान ६ फेºया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृतरित्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ अशी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आहे; परंतु, सायंकाळी ६ नंतर रात्री उशिरापर्यंतही मनपाच्या पाँर्इंटवरुन पाणी नेले जाते, अशी माहिती यावेळी काही नागरिकांनी दिली. काहींनी या टँकरचे पाणी खाजगी व्यक्तींना सर्रासपणे दिले जात असल्याचे सांगितले. यातून आर्थिक संपन्नता साधत असल्याच्या तक्रारी आहेत.