परभणी : टँकरच्या सहाय्याने झाडांना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:41 AM2019-05-11T00:41:00+5:302019-05-11T00:41:25+5:30
तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़
सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे़ या शाळेचा परिसर मोठा असल्याने शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले़ सध्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे़ वाणीसंगम येथेही पाण्याची वाणवा आहे़ जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात लावलेली झाडे पाण्याअभावी सुकून जात असल्याचे शिक्षकांसह शालेय व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आले़ तेव्हा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपान झिर्पे यांनी पुढाकार घेत आपल्या जवळील ट्रॅक्टरमध्ये शेतातील पाणी आणून शाळा परिसरातील झाडांना पाणी देणे सुरु केले आहे़ शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी घेतलेल्या पुढाकाराचे गाव परिसरात कौतुक होत आहे़ त्याचबरोबर दुष्काळात झाडांना पाणी मिळत असल्याने झाडे हिरवी झाली आहेत़
स्वखर्चातून पाणीपुरवठा
४वाणीसंगम व गाव परिसरातील जलस्त्रोत आटले आहेत़ त्याचबरोबर हातपंपही कोरडेठाक पडल्याने गावात पाणीटंचाई आहे़
४उन्हाच्या तीव्रतेने शाळा परिसरातील झाडे सुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या झाडांना पाणी आणायचे कोठून असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर उभा राहिला़
४शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झिरपे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून गाव परिसरातील शेतामधून टँकरच्या सहाय्याने पाणी आणून या झाडांना देण्यास सुरुवात केली आहे.