परभणी : मृतसाठ्यातून घ्यावे लागणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:03 AM2018-10-29T00:03:46+5:302018-10-29T00:03:57+5:30

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नसून पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करताना सिद्धेश्वर, मासोळी, मुळी बंधाऱ्याच्या मृतसाठ्यातील पाणीही वापरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुनच आगामी काळातील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात येते.

Parbhani: Water will have to be taken from the dead | परभणी : मृतसाठ्यातून घ्यावे लागणार पाणी

परभणी : मृतसाठ्यातून घ्यावे लागणार पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नसून पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करताना सिद्धेश्वर, मासोळी, मुळी बंधाऱ्याच्या मृतसाठ्यातील पाणीही वापरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुनच आगामी काळातील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात येते.
परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्याचा परिणाम सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाणीपुरवठ्यावरही होणार आहे. आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीसाठे शिल्लक नसल्याने ग्रामीण भागामध्ये भूजल पातळीत घट झाली असून टंचाई सदृश्य परिस्थिती डोके वर काढत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांमधून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. या प्रकल्पातच पाणी नसल्याने या योजना किती दिवस तग धरतील, असा प्रश्न निर्माण होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याचा आढावा घेण्यात आला. एकूण पाणीसाठा आणि जुलै महिन्यापर्यंत लागणारे पाणी याची मोजदाद करण्यात आली तेव्हा दोन प्रकल्पांमधून चक्क मृतसाठ्यातील पाणी वापरावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांवरील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित केले आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील काही गावांसाठी पाणी आरक्षण करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात सिद्धेश्वर प्रकल्पामध्येच पुरेसे पाणी नसल्याने मृतसाठ्यातूनही पाणी घ्यावे लागणार आहे. सिद्धेश्वर प्रकल्पामधून परभणी आणि पूर्णा शहरासाठी ३० दलघमी, जिंतूर येथील १२ गाव वस्सा पाणीपुरवठा योजनेसाठी ०.४४९ दलघमी आणि पूर्णा तालुक्यातील १८ गावांसाठी ०.१७३ दलघमी असे ३०.६२२ दलघमी पाणी या प्रकल्पात आरक्षित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये १७.१८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर उर्वरित पाणी मृतसाठ्यातून उचलावे लागणार आहे.
गंगाखेड तालुक्यातही अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये केवळ १.७२४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगखेड शहराला जुलै महिन्यापर्यंत ३.२०० दलघमी पाणी लागणार असून हे सर्व पाणी मासोळी प्रकल्पात आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित पाणीसाठा मृतसाठ्यातून उचलावा लागणार आहे.
याच तालुक्यातील मुळीच्या बंधाºयामध्ये ०.४१० दलघमी पाणीसाठा जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील ७ गावांसाठी ०.०६४ आणि गंगाखेड शहरासाठी १ दलघमी असे १.०६४ दलघमी पाणी मुळी बंधाºयात आरक्षित करण्यात आले आहे. या बंधाºयाचाही मृतसाठा वापरावा लागणार आहे. मानवत तालुक्यातील झरी तलावातही १.१६० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
या तलावात मानवत शहरासाठी २.८८० आणि तालुक्यातील १० गावांसाठी ०.०८५ असे २.९६५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तलावातील मृतसाठा आणि उपयुक्तसाठा मिळून या तलावात १.३६० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई नागरिकांना जेरीस आणणार असल्याचे आतापासूनच दिसू लागले आहे.
डिग्रसचा : बंधारा नावापुरताच
४पालम तालुक्यामध्ये गोदावरी नदीवर डिग्रस उच्चपातळी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामध्ये ०.२८० दलघमी पाणीसाठा मृतसाठा म्हणून उपलब्ध आहे. तर ३७.९७० दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. या बंधाºयात ३८.२५० दलघमी एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या तुलनेत २७.२१८ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. मात्र हे पाणी आरक्षण करताना नांदेड जिल्ह्याला झुकते माप दिले असून २७ दलघमीमधील २५ दलघमी पाणी विष्णुपुरी प्रकल्पाच्या बिगर सिंचन वापरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. उर्वरित आरक्षणात पालम शहरासाठी २ दलघमी, पूर्णा तालुक्यातील ७ गावांसाठी ०.१२१ दलघमी आणि पालम तालुक्यातील १० गावांसाठी ०.०९८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हा बंधारा जरी परभणी जिल्ह्यात असला तरी त्याचा सर्वाधिक लाभ नांदेड जिल्हा घेणार आहे.
जायकवाडीचा आधार
जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वार जिल्ह्याला मिळते. मात्र, या कालव्याच्या पाणी पाळीचेही अद्याप नियोजन झाले नाही.
१७.३ दलघमी मृतसाठ्यातून
४परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने उपयुक्त पाणीसाठा वगळून मृतसाठ्यातून पाणी घेण्याची वेळ यावर्षी जिल्हावासियांवर ओढावली आहे. सिद्धेश्वर, मासोळी, मुळी, झरी या प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने तीनही प्रकल्पांतील मृतसाठ्यातून पाणी घ्यावे लागणार आहे. सिद्धेश्वर प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून १३.४४२ दलघमी, मासोळी मध्यमप्रकल्पाच्या मृतसाठ्यातून १.४७६ दलघमी, मुद्गल बंधाºयाच्या मृतसाठ्यातून ०.६५४ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरावे लागणार आहे. मानवत तालुक्यातील झरी प्रकल्पात तर मृतसाठा आणि उपयुक्तसाठाही पुरेसा नसल्याने १.८०५ दलघमी पाण्याची व्यवस्था इतर ठिकाणाहून करावी लागणार आहे. झरी तलावात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी घेतले जाते. त्यामुळे झरी तलावातील पाण्याविषयी फारसी गंभीर स्थिती नाही.

Web Title: Parbhani: Water will have to be taken from the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.