परभणी : नळ जोडणी दराबाबत जनभावनेचा आदर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:39 AM2020-02-13T00:39:28+5:302020-02-13T00:40:59+5:30
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेतून देण्यात येणाऱ्या नळ जोडणीच्या दरासंदर्भात जनभावनेचा आदर करण्यात येणार असून या संदर्भात मनपा सदस्य, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेतून देण्यात येणाऱ्या नळ जोडणीच्या दरासंदर्भात जनभावनेचा आदर करण्यात येणार असून या संदर्भात मनपा सदस्य, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महानगरपालिकेने नवीन नळ जोडणी देण्यासाठी २ हजार रुपये अनामत व ९ हजार रुपये नळ जोडणी, पाण्याचे मीटर, रस्ता दुरुस्ती, १५मीटर पाईप आदी साहित्य असे एकूण ११ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयाला नागरिकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी या संदर्भात ३५ हजार नळ धारकांचे साडेदहा कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या संदर्भातील वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच मनपा वर्तूळात खळबळ उडाली. या संदर्भात तातडीने बुधवारी दुपारी ३ वाजता मनपा आयुक्त रमेश पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले की, नळ जोडणी संदर्भातील काम खाजगी एजन्सीला देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. या संदर्भातील दर देखील सर्वसाधारण सभेतच निश्चित करण्यात आले आहेत. त्याला सभागृहाने मंजुरी दिली आहे. शहरातील पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजुने आहे. त्यामुळे या पाईपलाईन जवळील नागरिकांना व पाईपलाईनपासून दूर असलेल्या रस्त्याच्या पलीकडील नागरिकांना नळ जोडणीसाठी एकच दर आकारण्याचा मध्यम मार्ग सभागृहात घेण्यात आला होता. या संदर्भातील अनेक नागरिकांची निवेदने आली आहेत. त्यामुळे या संदर्भातील जनभावनेचा निश्चितच आदर केला जाईल. ज्या नागरिकांना नळ जोडणीसाठी जेवढा खर्च येईल, तेवढाच खर्च संबंधितांकडून घ्यावा, या अनुषंगाने मनपातील पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले. शहरासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार झालेली पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरु झाली पाहिजे व त्यातून नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी मिळावे, ही मनपाची भूमिका आहे, असेही आयुक्त पवार म्हणाले.
२६ हजारांच्या : अनामतबबात फेरविचार
४जुन्या योजनेंतर्गत ज्या २६ हजार नळधारकांनी मनपाकडे अनामत रक्कम जमा केल्या आहेत. त्यासंदर्भात नव्या योजनेचे काम सुरु झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणारच होता; परंतु, जनतेची मागणी लक्षात घेऊन या संदर्भात निश्चित फेर विचार केला जाईल. नवीन नळ योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी दर महिन्याला जवळपास ६५ लाख रुपये मनपाला लागणार आहेत.
४जुन्या नळ योजनेतील अनामत रक्कम व नव्या योजनेच्या अनामत रक्कमेच्या व्याजातून दर महिन्याचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविण्याचा मनपाचा इरादा आहे, असेही आयुक्त पवार यांनी सांगितले.
सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत तयार नाही
४२७ जानेवारी रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या १५ मिनिटांत नवीन नळ जोडणीच्या दरांना मंजुरी देण्यात आली होती. ही सर्वसाधारण सभा होऊन १६ दिवसांचा कालावधी झाला. तरीही सभेचा इतिवृत्तांत अद्याप तयार झालेला नाही. हा इतिवृत्तांत काही सदस्यांनी मागितला; परंतु, त्यांना तोे मिळालेला नाही. इतिवृत्तांत तयार न होण्याचे कारण अस्पष्ट आहे.
काही नगरसेवकांची दुहेरी भूमिका कायम
४महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनीच जाहीरपणे नव्या नळ जोडणीच्या दरांना विरोध केला. या संदर्भातील वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर काही नगरसेवकांनी खाजगीत आमचाही नवीन दरांना विरोध असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे दिली; परंतु, जाहीर भूमिका मात्र त्यांनी घेतली नाही.
४त्यामुळे त्यांच्या दुहेरी भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. काही नगरसेवकांना नळ जोडणीचे नवीन दर मान्य नाहीत; परंतु, त्यांनीही या संदर्भात चुप्पी साधली आहे. त्यांच्या चुप्पीचे कारण स्पष्ट झालेले नाही.