परभणी : संजय जाधव यांचा दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:44 AM2019-05-24T00:44:09+5:302019-05-24T00:45:19+5:30
परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदतीला मित्र पक्षाचे सहकारी आले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदतीला मित्र पक्षाचे सहकारी आले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
सर्वसामान्य शिवसैनिक ते दोन वेळा आमदार व दुसऱ्यांदा खासदार होण्याच्या त्यांनी साधलेल्या किमयेमागे त्यांचे मजबूत पक्षीय संघटन व दांडगा जनसंपर्क कारणीभूत आहे. सामूहिक विवाह सोहळा, आरोग्य शिबीर, दहीहंडी स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, राजे संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या क्रीडा स्पर्धा आदींच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कायम राहिला. शिवाय वैयक्तिरित्या बहुतांश मतदारांशी व व्यापाऱ्यांशी थेट संपर्क राहिल्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. त्यामुळेच त्यांना चार विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात नेहमीप्रमाणे खा.जाधव यांना २३ हजार ९५७ मतांची आघाडी मिळाली. येथे भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, शिवसेनेचे जि.प.सदस्य राम पाटील खराबे यांनी राबविलेली प्रचारयंत्रणा स्पष्टपणे दिसून आली. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघही नेहमीप्रमाणे खा. जाधव यांच्या पाठीशी राहिला. या मतदारसंघातून खा.जाधव यांना २८ हजार ४७५ मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना व स्थानिक समीकरणेही विरोधात असल्याची चर्चा असताना खा. जाधव यांनी घेतलेले मताधिक्य चर्चेचा विषय राहिला आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी राबविलेली प्रचारयंत्रणा खा. जाधव यांच्या कामी आली असून त्यांना या मतदारसंघातून १८ हजार ७२२ मतांची आघाडी मिळाली आहे. तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते हिकमत उडाण यांनी मेहनत घेतल्याने खा.जाधव यांना २४ हजार २९२ मतांची आघाडी मिळाली आहे. ज्यामुळेच खा.जाधव यांचा विजय सुकर झाला.