परभणीत स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे दुसऱ्यांदा होणार भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:50 PM2019-01-12T15:50:13+5:302019-01-12T15:50:37+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

Parbhani Women's Hospital's stone placing will be going to the second time | परभणीत स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे दुसऱ्यांदा होणार भूमिपूजन

परभणीत स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे दुसऱ्यांदा होणार भूमिपूजन

Next

परभणी- येथील १०० खाटांच्या स्वतंत्र स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे साडेचार वर्षानंतर दुसऱ्यांदा रविवारी भूमिपूजन होणार असून यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

परभणी येथे २००५ मध्ये स्त्री रुग्णालयास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २००६ मध्ये जिल्हा रुग्णालयात ते कार्यान्वित झाले. त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग बंद करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील शनिवार बाजार भागात स्त्री रुग्णालयाची इमारतीचे बांधकाम करण्यात आले; परंतु, या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या जागेत नेत्र रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते शहरातील दर्गारोड भागात स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी फक्त कोनशिला उभारण्याचीच औपचारिकता पूर्ण झाली होती. 

निधीची पुरेशी तरतूद नसल्याने इमारत उभी राहू शकली नाही. त्यानंतरच्या वर्षात २ कोटी रुपयांचा निधी या इमारतीसाठी उपलब्ध झाला. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यातील ३ कोटी रुपये सध्या जिल्हा आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. १३ जानेवारी  रोजी सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दुसऱ्यांदा या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. 

यावेळी आरोग्य संचालक तथा आयुक्त अनुपकुमार यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, औरंगाबाद येथील उपसंचालक डॉ.स्वप्नील लाळे यांच्यासह स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती राहणार आहे.  विशेष म्हणजे यापूर्वी स्त्री रुग्णालयाच्या नावावर शनिवार बाजार भागात इमारत बांधण्यात आल्याने लेखापरिक्षणात या संदर्भात आक्षेप घेतील म्हणून माता आणि बालकांच्या (एमसीएच विंग) आरोग्याची १०० खाटांची इमारत या नावाखाली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे संपूर्ण बांधकाम हे राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या औरंगाबाद येथील कार्यालयांतर्गत होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याची आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून भूमिपूजनानंतर तातडीने बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Parbhani Women's Hospital's stone placing will be going to the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.