परभणी : आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:47 AM2018-12-12T00:47:10+5:302018-12-12T00:47:17+5:30
शहरातील विविध भागात आरोग्य सेवा सुरळीत व्हावी, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सहा आरोग्य केंद्रांपैकी चार केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही केवळ फर्निचरचे काम रखडल्याने या इमारती शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. परिणामी शहरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील विविध भागात आरोग्य सेवा सुरळीत व्हावी, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सहा आरोग्य केंद्रांपैकी चार केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही केवळ फर्निचरचे काम रखडल्याने या इमारती शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. परिणामी शहरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.
परभणी शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कल्याण मंडमप् परिसरात महापालिकेचे रुग्णालय आहे. शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेऊन प्रत्येक भागात नागरी आरोग्य केंद्र सुरू करुन या केंद्रांमधून आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्यानुसार सहा ठिकाणी आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली. साखला प्लॉट, खानापूर, खंडोबा बाजार, इनायतनगर, दर्गा रोड आणि शंकरनगर या ठिकाणी आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, पाच ठिकाणी इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र केवळ फर्निचर आणि विद्युतीकरणाचे काम रखडल्याने या इमारतीतून आरोग्यसेवा सुरू झाली नाही. केवळ साखला प्लॉट भागातील एकाच आरोग्य केंद्राच्या इमारतीतून आरोग्य सुविधा सुरू झाली आहे. केवळ फर्निचर नसल्याने नवीन इमारतीत आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. परिणामी रुग्णांच्या सेवेवर परिणाम होत आहे.
नवीन इमारत धूळ खात पडून
परभणी शहरात उभारल्या जाणाºया या आरोग्य केंद्रांच्या इमारतीची पाहणी केली असता इमारत बांधकाम आणि रंगरंगोटी करुन आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी सज्ज असलेली इनायतनगर येथील इमारत धूळ खात असल्याचे दिसून आले. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी फर्निचर आणि विद्युतीकरणाचे काम झाले नसल्याने या नवीन इमारतीला कुलूप लावण्याची वेळ मनपावर आली आहे. त्यामुळे केवळ फर्निचर नसल्याने अद्यापही आरोग्य केंद्र सुरू नसल्याचे दिसून आले.
साखला प्लॉट भागातील आरोग्य केंद्राला भेट दिली असता, दुपारच्या वेळी हे केंद्रही बंद असल्याचे पहावयास मिळाले. सकाळच्या सत्रात हा दवाखाना सुरू असतो, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रेल्वे पटरीच्या पलीकडील बाजूस हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. खंडोबा बाजार भागात मंदिराच्या समोर अगदी छोट्या जागेत आरोग्य केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे रुग्णसेवा मिळत असली तरी रुग्णांना भौतिक सुविधा उपलब्ध होत नसल्याचेच दिसते.
विधान परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोघम माहिती
राष्टÑीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम व फर्निचरची कामे अपूर्ण असल्याने तसेच साखला प्लॉट भागातील आरोग्य केंद्रात दर्जेदार सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. काम पूर्ण न करणाºया कंत्राटदार व जबाबदार अधिकाºयांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.
त्यावर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काम रखडले हे खरे आहे; परंतु रुग्णांची गैरसोय होत नसल्याने म्हटले आहे. खंडोबा बाजार येथील इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. फर्निचर खरेदीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. इनायतनगर, खानापूर, सय्यद तुराबूल हक्क दर्गा परिसर आदी ठिकाणी फर्निचरचे काम बाकी असल्याचे स्पष्ट केले. तर शंकरनगर येथे जागा उपलब्ध नसल्याने इमारत बांधकाम सुरू झाले नाही, असे सांगितले. परंतु काम पूर्ण न करणाºया कंत्राटदार आणि अधिकाºयांवर काय कारवाई करणार, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले आहे.