परभणी : शिवसेनेचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी केले कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:27 AM2018-11-01T00:27:12+5:302018-11-01T00:27:52+5:30
सर्वसाधारण सभेचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्यानंतरही सत्ताधाºयांनी सेनेचा विरोध धुडकावून विविध निर्णय घेतले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सर्वसाधारण सभेचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्यानंतरही सत्ताधाºयांनी सेनेचा विरोध धुडकावून विविध निर्णय घेतले़
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे बुधवारी दुपारी ३ वाजता जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर जि़प़ सीईओ बी़पी़ पृथ्वीराज, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, महिला व बालकल्याण सभापती राधाताई सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे आदींची उपस्थिती होती़ सभेच्या प्रारंभीच शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले़ विष्णू मांडे यांनी सत्ताधारी पक्षाकडून दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करण्यात आले असल्याचा आरोप केला़ जिल्हा नियोजन समितीला एक इतिवृत्त दिले जात आहे तर दुसरे विरोधी पक्षातील सदस्यांना वेगळे इतिवृत्त दिले जात आहे़ सत्ताधाºयांची ही दिशाभूल सहन करणार नाही़ निधी वाटपातही दुजाभाव केला जात आहे़, असा आरोप केला असता, राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी यांनी त्यांना रोखले़ यावर मांडे यांनी सदस्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही, हा सदस्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असे सांगून पत्रकारांना सभागृहात प्रवेश द्या, इनकॅमेरा सर्वसाधारण सभा घ्या, असे म्हणत सत्ताधाºयांचा निषेध करीत ते सभागृहाबाहेर आले़ त्यानंतर शिवसेनेचे गटनेते राम खराबे, सदस्य जनार्धन सोनवणे, अंजली पतंगे, अंजली आणेराव आदी शिवसेनेचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले़ यावेळी पत्रकारांना सभागृहात प्रवेश द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, बाळासाहेब रेंगे, शिवसेनेचे गटनेते राम खराबे पाटील, विष्णू मांडे, अंजलीताई पतंगे, भाजपाचे डॉ़ सुभाष कदम यांनी जि़प़ अध्यक्षा उज्जवलाताई राठोड यांना दिले़ त्यानंतर हे सदस्य सभागृहाबोहर आले व विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात बसले़ त्यांच्यापाठोपाठ रासपचे सदस्य राजेश फड हे विरोधी सदस्यांची समजूत काढण्यासाठी आले़ त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना सभागृहाबाहेर राहून बहिष्कार टाकण्यापेक्षा सभागृहात उपस्थित राहून मांडण्यात आलेल्या विषयांवर तुमचे मत नोंदवा, असे सांगितले़ परंतु, विरोधी सदस्य ऐकण्याच्या तयारीत नव्हते़ काही वेळानंतर दोन वेगवेगळे इतिवृत्त सत्ताधाºयांकडून देऊन दिशाभूल करीत असल्याचा निषेध करणारे निवेदन शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात जावून पुन्हा जि़प़ अध्यक्षा राठोड यांना दिले़ त्यानंतर पुन्हा हे सदस्य सभागृहाबाहेर आले़ तिकडे सभागृहात शिवसेनेच्या विरोधाची फारशी दखल न घेता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कामकाज सुरूच ठेवले़ या कामकाजात काँग्रेस सदस्यांनीही सहभाग नोंदविला़
बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांवर सदस्यांचे गंभीर आरोप
या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेख यांच्यावर जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम व रामराव उबाळे यांनी आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप केले़ शेख यांच्याकडून सदस्यांचीच अडवणूक केली जाते, असे सांगितले़ त्यामुळे शेख यांनी सदस्यांनाच आपल्या विषयी अविश्वास वाटत असेल तर आपणास शासनाकडे पाठवून द्यावे, अशी मागणी केली व त्यांनी पदभार सोडत असल्याचेही सांगितले़ यावेळी जिंतूर येथील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता खान यांच्या संदर्भातही सदस्यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप केले़ त्यानंतर खान यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला़ गतवर्षीच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा निधी अखर्चित ठेवल्याबद्दल समाजकल्याण व कृषी विभागाच्या तत्कालीन अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ गतवर्षी ई-लर्निंग अंतर्गत ९७ लाख रुपयांची कामे केल्या प्रकरणात चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला़ त्यात संबंधित कंत्राटदार दोषी आढळल्याने त्यांची ९ लाख ८६ हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला़ दुपारी ३ वाजता सुरू झालेली ही सभा रात्री ८ वाजता संपली़