परभणी : राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:22 AM2018-09-08T00:22:04+5:302018-09-08T00:22:59+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर भागात रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता अर्धवट का सोडून देण्यात आला, असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर भागात रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता अर्धवट का सोडून देण्यात आला, असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग २२२ हा पाथरी शहरातून जातो. गत वर्षभरापासून ढालेगाव ते मानवत रोड रेल्वे स्टेशन पर्यंत रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण चे काम सुरू होते. या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरात न्यायालय परिसर ते पोखर्णी फाटापर्यंत रस्त्यावर दुभाजकही बसविण्यात आले आहेत. सेलू कॉर्नर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे. त्या ठिकाणी पुतळ्यासाठी जागा सोडण्याची मागणी तालुक्यातील शिवभक्तांची असल्याने या ठिकाणी जागा सोडून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी आहे. सेलू कॉर्नर परिसरात या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी सदरील एजन्सीने काम सुरू केले होते. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पुतळ्यासाठी जागा सोडून काम होत नसल्याने हे काम बंद पाडले होते. त्या वेळी शिवसेना पदाधिकारी, पोलीस यंत्रणा आणि काम करणाऱ्या एल अॅन्ड टी एजन्सीच्या अधिकाºयांसोबत पाथरी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली होती. काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाºयांची पाहणी होऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा झाली. मात्र या घटनेला ही बराच कालावधी लोटला गेला आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गचे काम पूर्ण झाले आहे;परंतु, सेलू कॉर्नर परिसरात कोणताही तोडगा न काढता अर्धवट अवस्थेत काम सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे सेलू कॉर्नर परिसरातील रस्त्याचा आणि जागेचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदारांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.