परभणी : ६१ कोटींची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:46 AM2018-08-19T00:46:36+5:302018-08-19T00:47:15+5:30

एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा- १ व २ अंतर्गत ६० कोटी ९८ लाख रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली़ मात्र कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे ही कामे ठप्प पडली असून, मुदत संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे होणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़

Parbhani: The works of 61 crores slow down | परभणी : ६१ कोटींची कामे संथगतीने

परभणी : ६१ कोटींची कामे संथगतीने

Next

मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा- १ व २ अंतर्गत ६० कोटी ९८ लाख रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली़ मात्र कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे ही कामे ठप्प पडली असून, मुदत संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे होणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़
महावितरण कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात वीज वितरण केले जाते़ जिल्ह्यात १० उपविभागांतर्गत जवळपास अडीच लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो़ वीज वितरणात येणाऱ्या अडचणी सुरळीत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात़ वीज पुरवठा मुबलक प्रमाणात आणि सुरळीत व्हावा, या उद्देशाने विद्युत यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना टप्पा-१, २, पायाभूत आराखडा टप्पा-१, २ त्याचबरोबर एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा-१, २ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत़ एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा-२ मधील १७ कामांसाठी देण्यात आलेली १८ महिन्यांची मुदतही संपण्यास आली आहे़ तर टप्पा १ मधील कामांसाठी २ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़ मात्र कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे कोट्यवधी रुपयांच्या कामांना लागलेला ब्रेक कायम आहे़
एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा-१ अंंतर्गत ३१ कोटी २२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ निविदा प्रक्रिया राबवून २७ एप्रिल २०१७ रोजी या कामाचे कार्यारंभ आदेशही काढण्यात आले़ १८ महिन्यांच्या काळात ही कामे पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारांना घातले होते़ या योजनेंतर्गत नवीन उपकेंद्र, अतिरिक्त रोहित्र, रोहित्र क्षमता वाढ, ३३ केव्हीची वाहिनी, ११ केव्हीची वाहिणी, ११ केव्हीची भूमिगत वाहिनी व ३३ केव्हीची भूमिगत वाहिनी उभारणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली होती़ ही कामे एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा-१ अंतर्गत करण्यास मंजुरी देण्यात आली़ त्यासाठी ३१ कोटी २२ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला़ त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधीही ठरवून देण्यात आला़
या कालावधीत कामे पूर्ण होणे अपेक्षित होते़; परंतु, कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे आतापर्यंत रोहित्र क्षमता वाढ, परभणी शहरातील एमकेव्ही १ व दर्गा रोड परिसरातील उपकेंद्रात १ अशी दोन ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत़ ४७ किमी पैकी १३ किमी ३३ केव्हीची वाहिनीही टाकण्यात आली आहे़ ९ नवीन उपकेंद्रांपैकी गंगाखेड, मानवत, पाथरी, पूर्णा व परभणी शहरातील विद्यानगर येथे नवीन उपकेंद्र बसविण्यात आले आहेत़ ४८ किमी पैकी २० किमी ११ केव्हीची वाहिनी टाकण्यात आली आहे़ तर ३३ केव्ही व ११ केव्हीच्या भूमिगत वाहिनी टाकण्यास अद्यापपर्यंत कंत्राटदाराला मुहूर्त मिळालेला नाही़
त्यामुळे ३१ कोटी २२ लाख रुपयांची कामे पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़ या दोन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न पडला आहे़
टप्पा २ मधील : कामांची मुदत संपली
४एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत २९ कोटी ७६ लाख रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून ६ जानेवारी २०१७ रोजी मे़ श्रवण इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर नांदेड या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला़ त्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली़ या मुदतीत जिल्ह्यामध्ये नवीन वितरण रोहित्र, रोहित्र क्षमता वाढ, ११ केव्ही वाहिनी, नवीन लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी क्षमता वाढ, लघुदाब वाहिनी क्षमता वाढ, ११ केव्ही भूमिगत वाहिनी, ए़बी़सी़ केबल, ११ केव्ही ब्रेकर्स, ३३ केव्ही बे विथ गॅन्ट्री, ११ केव्ही आयसोलेटर, कॅपॅसिटर बॅक, उच्चदाब खांब बदलणे, लघुदाब खांब बदलणे, एबी स्वीच बदलणे, वितरण पेटी बदलणे, बॅटरी व बॅटरीवरील चार्जर बदलणे आदी १७ कामे करावयाची होती़ परंतु, मुदत संपून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे तरी कंत्राटदाराकडून कामे करण्यात आली नाहीत़ त्यामुळे औरंगाबाद येथील महावितरणचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी लक्ष देऊन जिल्ह्यातील टप्पा-१ व टप्पा २ अंतर्गत ६१ कोटींची संथगतीने सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़

Web Title: Parbhani: The works of 61 crores slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.