परभणी: यंदाच्या लग्नसराईला आचारसंहितेची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:54 PM2019-04-01T23:54:55+5:302019-04-01T23:55:49+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ऐन लग्नसराईतच लागू झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून खरेदीसाठी रोख रक्कम सोबत बाळगणे जिकिरीचे वाटत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ऐन लग्नसराईतच लागू झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून खरेदीसाठी रोख रक्कम सोबत बाळगणे जिकिरीचे वाटत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली आहे. १८ एप्रिल रोजी मतदानानंतर आचारसंहिता शिथील होणार असली तरी ती २३ मेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीतच विवाहाचे मुहूर्त आहेत. त्यामध्ये १७ ते २० एप्रिल, २२ ते २४ एप्रिल, २६ ते २८ एप्रिल, ७, ८ , १२, १४, १५, १७, १९, २१ आणि २३ मे या विवाहाच्या तारखा आहेत. या तारखांना ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे, त्यांच्या घरी खरेदीसाठी घाई होणार आहे. खरेदीला जाण्यासाठी पैसे सोबतही बाळगावे लागणार आहेत. आता निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रत्येक शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणावर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणावर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. सोबत पैसे आढळल्यास त्याचा हिशोब नियुक्त आलेल्या पथकाला द्यावा लागत आहे. शिवाय त्या सोबतच याचे पुरावे द्यावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येत आहे. परिणामी निवडणुका होऊन जाऊ द्या, त्यानंतर लग्नाचे पाहूत, असाही काहीसा सूर वºहाडी घेऊ लागले आहेत.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये लग्न तिथींची संख्या अधिक असते. या काळात मंगल कार्यालय बहुतांश तारखांना महिनाभरापूर्वीच बुक होतात. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात दोन ते तीन तारखांनाच मंगल कार्यालयाची बुकिंग झाली. मे महिन्यात यापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. सर्वसाधारणपणे या दोन महिन्यात मंगल कार्यालयाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय होतो. मात्र यावर्षी व्यवसायावर ९० टक्के परिणाम झाला आहे.
-प्रमोद वाकोडकर, व्यावसायिक
यावर्षी लग्नतिथींची संख्या अधिक आहे; परंतु, त्या तुलनेत लग्न सोहळ्यांची संख्या मात्र रोडावली आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालयांची बुकिंग असते. मात्र यावर्षी ती निम्म्यावर आली आहे. तसेच लग्न सोहळ्यातील हौस आणि खर्चालाही आखडता हात घेतल्याने मंगल कार्यालयाचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थती आणि त्याच जोडीला निवडणुकीची आचारसंहिता याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे.
-शंकर आजेगावकर, व्यासायिक