परभणी : वर्षे सरली तरी मागासलेपण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:06 AM2019-05-01T00:06:52+5:302019-05-01T00:07:46+5:30

स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होऊन ५९ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ या प्रदीर्घ कालावधीत राज्यातील एक भाग असलेल्या परभणी जिल्ह्याने काय कमावले, काय गमावले, याचे अवलोकन केले असता, एक-एक वर्षे सरते झाले़ मात्र जिल्ह्यातील विकास विषयक प्रश्नांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचेच दिसते. त्यामुळे वर्ष सरले; परंतु, विकास मात्र मागे पडला, अशी एकंदरित भावना निर्माण झाली आहे़

Parbhani: For years, the backwardness continues | परभणी : वर्षे सरली तरी मागासलेपण कायम

परभणी : वर्षे सरली तरी मागासलेपण कायम

Next

प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होऊन ५९ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ या प्रदीर्घ कालावधीत राज्यातील एक भाग असलेल्या परभणी जिल्ह्याने काय कमावले, काय गमावले, याचे अवलोकन केले असता, एक-एक वर्षे सरते झाले़ मात्र जिल्ह्यातील विकास विषयक प्रश्नांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचेच दिसते. त्यामुळे वर्ष सरले; परंतु, विकास मात्र मागे पडला, अशी एकंदरित भावना निर्माण झाली आहे़
परभणी जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी शासन, प्रशासनाकडे मोठा वाव आहे; परंतु, उदासिनतेमुळे ठोस विकास कामे झाली जिल्ह्यात झाली नाहीत़ सिंचन, पर्यटन, उद्योग, शिक्षण अशा कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तर काही मिळविण्यापेक्षा असलेले टिकविणेही शक्य झाले नसल्याचे दिसत आहे़ १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे़ त्यामुळे या दिवशी परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मंथन आणि चिंतन करून यापुढे तरी ठोस दिशा निश्चित करून जिल्ह्याला विकास मार्गावर नेण्याची गरज निर्माण झाली आहे़ नैसर्गिक वारसा आणि दळणवळणाच्या मुबलक सुविधा उपलब्ध असलेल्या परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक मार्ग खुले आहेत; परंतु, या मार्गाने जाण्याची मानसिकता निर्माण होत नसल्याने स्वतंत्र महाराष्ट्राच्या ५९ वर्षांमध्येही जिल्ह्यात भरीव अशी कामे झाली नाहीत़ नवीन कामे तर सोडाच; परंतु, जी साधने उपलब्ध आहेत़, ती टिकवितानाही कमी पडल्याची परिस्थिती आहे़ नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात असलेल्या या जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी धरण वसलेले आहे़ या धरणाच्या विकासाच्या अनुषंगाने निधी प्राप्त होत नाही़ नवीन कामे ठप्प आहेत़ धरण परिसरात पर्यटनक्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे़ त्याचा प्रस्तावही तयार झालेला असताना त्यास गती मिळत नसल्याने हे धरण प्रशासकीय स्तरावर दुर्लक्षित राहत आहे़ त्याच जोडीला सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्प ३० वर्षांपासून रखडला होता़ मागील वर्षी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सिंचाई योजनेंतर्गत निधी मंजूर केला़ मात्र धरणाचे काम अद्यापही रखडले आहे़ डावा आणि उजव्या कालव्याची कामे ठप्प आहेत़ मागील काही वर्षांत गोदावरी नदीवर बांधलेली ५ उच्च पातळी बंधारे ही सिंचनातील कामगिरी ठरणारी आहे़ मात्र हे बंधारे बांधले असले तरी त्यातून अद्यापही १०० टक्के सिंचन होत नाही़ तारुगव्हाणचा बंधारा अजूनही अर्धवट अवस्थेत आहे़ शिक्षण क्षेत्रातही वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयाची जिल्ह्याला आवश्यकता आहे; परंतु, ही कामे रखडलेली आहेत़
औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्याची मोठी पिछेहाट झाली आहे़ रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाने हा जिल्हा जोडलेला असतानाही या ठिकाणी एकही मोठा प्रकल्प उभारला गेला नाही़ त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याची स्थिती जैसे थे आहे़
बेट खचू लागले
जांभूळबेटाच्या संवर्धनासाठी या संपूर्ण बेटाला तटबंदी उभारणे गरजेचे आहे़ पाण्याच्या प्रवाहाने बेटाचा भाग दिवसेंदिवस खचत आहे़ २५ हेक्टर क्षेत्रावरील हे बेट खचत चालले असून, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़
जांभूळबेटाचे वैभव लयाला जाण्याच्या स्थितीत
च्गोदावरी नदीने विळखा घातल्याने निसर्गनिर्मित जांभूळबेट पालम तालुक्यातील आरखेड, गुळखंड शिवारात तयार झाले आहे़ या बेटावर मोठ्या प्रमाणात वन औषधींची झाडे आहेत़
च्जांभूळ, लिंब, नीलगिरी अशा झाडांनी नटलेले हे बेट पर्यटकांना निश्चितच साद घालणारे आहे; परंतु, या बेटाच्या विकासासाठी एक रुपयाचा खर्चही आतापर्यंत झाला नाही़
च्हे बेट जिल्हावासियांकडूनच दुर्लक्षित आहे़ या बेटाच्या परिसरात बोटींग, पर्यटकांसाठी निवासस्थाने, बेटापर्यंत पोहोचण्यासाठी तालुक्यापासून चांगला डांबरी रस्ता या मुबलक सुविधा तरी उपलब्ध केल्या तरी हे क्षेत्र चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते़
बेटाच्या अस्तित्वाचाच सुटेना प्रश्न
जांभूळबेट हे निसर्गरम्य स्थळ असले तरी या बेटाचा विकास करण्यासाठी हे क्षेत्र महसूल प्रशासनाच्या नोंदीत येणे आवश्यक आहे़ या क्षेत्राची नोंद महसूलच्या दप्तरी अद्यापही झालेली नाही़ त्यामुळे या बेटाचा कुठल्या आधारावर विकास करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे प्रशासनाने किमान या बेटाचे क्षेत्र महसूल दप्तरी नोंद करण्याची गरज आहे़
रेल्वेचे प्रश्न सुटेनात
४दक्षिण-मध्ये रेल्वेचे जंक्शनचे ठिकाण असलेल्या परभणी रेल्वेस्थानकाचेच अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ या स्थानकाच्या विकासासाठी पाठपुरावा कमी पडत असल्याचे दिसत आहे़
४परभणी येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत़ रेल्वे मार्ग दुहेरीकरण, छोट्या स्थानकाचा विकास ही कामे रखडलेली आहेत़
४जिल्ह्यातील साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पाथरी शहराला जोडणारा मानवत-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे़ या शिवाय पूर्णा तालुक्यातील चुडावा येथून रेल्वे मार्गाला बायपास काढण्याचा प्रश्नही रखडलेला आहे़
पर्यटन विकास ठप्प
पर्यटनाची ठोस कामे झालीच नाहीत़ येलदरी, जांभूळबेट, नेमगिरी या प्रमुख स्थळांबरोबरच अनेक पुरातन वास्तूंची दुरवस्था झाली आहे़ चारठाणा, धारासूर, गंगाखेड इ. ठिकाणचे पुरातन वैभव प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे़
वीज जाळे वाढेना
जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अजूनही कुचकामी ठरली आहे़ महावितरणच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला़ मात्र ही कामे ठप्प पडली आहेत़ लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने विजेच्या समस्या कायम आहेत़

Web Title: Parbhani: For years, the backwardness continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.