परभणी: भिंतीचे दगड ढासळल्याने येलदरी धरणाला धोका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:58 PM2019-07-08T23:58:39+5:302019-07-08T23:59:18+5:30
मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
येलदरी येथे १९६८ साली धरण बांधकाम करण्यात आले. मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी हे एक धरण आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने या धरणाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झुडूपे वाढली आहेत, दगड ढासळत आहेत. त्यामुळे भविष्यात हे धरण १०० टक्के भरले तर मातीच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र याचे गांभीर्य जलसंपदा विभागाला राहिलेले नाही. येलदरी धरणाची परिस्थिती सध्या हे धरण बेवारस झाले आहे. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाची तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची आवश्यकता आहे.
सुरक्षा विभागाच्या शिष्टमंडळाचा अहवाल गुलदस्त्यात
४नाशिक येथील धरण सुरक्षा विभागाच्या एका शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी या धरणाची पाहणी केली होती. धरण परिसरातील अति महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून हा अहवाल जलसंपदा विभागाला सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु, पाहणीनंतर या अहवालाचे काय झाले? हे अद्याप समजले नाही.
४या पाहणीत धरणाची दगडी भिंत, मातीच्या भिंतीची पाहणी केली होती. मातीच्या भिंतीच्या आतून पाझरणारे पाणी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही, धरणाचा मुख्य गाभा व्यवस्थित आहे का? पावसाळ्यात कोणती कामे करावी लागतील, याचा आढावा शिष्टमंडळाने घेतला होता.
पूर्णवेळ : अधिकारी मिळेना
४मागील पाच ते सहा वर्षापासून या प्रकल्पासाठी एकही पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नाही. नियमित कर्मचारीही नाहीत. एकेकाळी शंभरहून अधिक कर्मचारी असणाऱ्या या धरणावर आता बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे ठप्प आहेत. याशिवाय वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने धरणाचे मोठे नुकसान होत आहे. पुरेशी वीज व्यवस्था, सुरक्षारक्षक या सुविधा उपलब्ध नसल्याने हे धरण आजमितीला बेवारस झाले आहे.