परभणी : ग्राहक मंचाने युको बँकेला सुनावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:58 AM2019-01-09T00:58:27+5:302019-01-09T00:58:47+5:30
ग्राहकांना सेवा पुरविताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत युको बँकेने ७ शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय परभणी जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: ग्राहकांना सेवा पुरविताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत युको बँकेने ७ शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय परभणी जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे.
या संदर्भात अॅड.जी.बी.भालेराव यांनी माहिती दिली- त्यानुसार तालुक्यातील पिंगळी येथील शेतकरी साहेबराव गुणवंतराव देशमुख व इतर शेतकºयांनी २०१६ मध्ये मिरखेल येथील शेतात सोयाबीन पेरणी केली होती. त्यासाठी युको बँकेतून पीक कर्ज घेतले होते. सोयाबीन पिकाचा विमा भरण्यासाठी पीक पेरा प्रमाणपत्र, सातबारा उतारा इ. कागदपत्रे विमा अर्जासोबत जमा केली. बँकेनेही पीक विमा हप्ता भरल्याची रक्कम पेरणी क्षेत्रानुसार खात्यावरुन वजा केली. मात्र गावातील इतर शेतकºयांना सोयाबीनचा पीक विमा मिळत असताना साहेबराव देशमुख व इतरांना तो मिळाला नाही. वारंवार पाठपुरावा करुनही विमा मिळत नसल्याने शेतकºयांनी अॅड. जी.बी.भालेराव यांच्यामार्फत ग्राहकमंचाकडे तक्रार दाखल केली.
त्यात शेतकºयांनी सोयाबीन पिकासाठी विमा उतरविला असताना बँकेने जुन्या अहवालानुसार तूर पिकासाठी रक्कम भरल्याचे निष्पन्न झाले. यातून बँकेचा निष्काळजीपणा व त्रुटी दिसून आली.
४सुनावणीअंती युको बँकेने साहेबराव देशमुख यांना २४ हजार ८४० रुपये, शिवाजी देशमुख यांना ५० हजार ४० रुपये, शैलेजा देशमुख यांना १ लाख ३ हजार ६८० रुपये, गुणवंत देशमुख यांना १ लाख ७ हजार २८० रुपये, अनंतराव देशमुख यांना ७१ हजार ६४० रुपये, जयश्री देशमुख यांना ६५ हजार १६० आणि राघुबुवा कपाटे यांना ३६ हजार रुपये पीक विमा ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश ग्राहकमंचचे अध्यक्ष ए.जी.सातपुते, सदस्या किरण मंडोत यांनी दिले. तसेच तक्रारदारांना मानसिक व शारीरिक खर्चापोटी २ हजार व तक्रारींच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. तक्रारदाराच्या वतीने अॅड.जी.बी.भालेराव यांनी काम पाहिले.