परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 08:01 PM2024-08-20T20:01:34+5:302024-08-20T20:03:29+5:30

यापूर्वी आ.तान्हाजी मुटकुळे व माजी आ.बाबाजानी दुर्राणी हे बँक संचालक पदासाठी अपात्र ठरले. त्यांचाही पुनर्विचार अर्ज सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी फेटाळला आहे.

Parbhani Zilla Bank Chairman Suresh Varpoodkar shocks; Disqualification also remains with the Minister of Co-operation | परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम

परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी संचालकपद अपात्र ठरल्याने सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. मात्र, ते नामंजूर झाल्याने वरपूडकर यांची अपात्रता कायम राहिली आहे.

वरपूडकर हे विविध कार्यकारी सेवा संस्था वरपूड या संस्थेवर स्वीकृत संचालक म्हणून निवडून आले होते. तर या आधारावरून ते परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवडून आले होते. मात्र, वरपूड सेवा संस्थेवर परभणी मध्यवर्ती बँकेची थकबाकी असल्याने विभागीय सह. निबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी २० ऑक्टोबर २०२३ रोजी वरपूडकर यांना बँकेचे संचालक म्हणून अपात्र केले आहे. याविरुद्ध ते प्राधिकरणाकडे गेले असता त्यांनी पुन्हा सहनिबंधकांकडेच फेरनिर्णयार्थ पाठविले होते.

तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यास सहकार आयुक्तांस निर्देशित केले होते. त्यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी ते मुंबई सहनिबंधकांकडे वर्ग केले होते. त्यांनीही २२ मार्च २०२४ रोजी वरपूडकर यांना अपात्र घोषित केले होते. पुन्हा प्रकरण न्यायालयात गेले होते. शेवटी सहकार मंत्र्यांकडे गेले. यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वरपूड सेवा संस्थेकडे थकबाकी असल्याने वरपूडकर हे संचालकपदी राहण्यास अपात्र ठरतात, असे म्हटले. त्यामुळे वरपूडकर यांचा पुनरिक्षण अर्ज नामंजूर करण्यात आला आहे तर २२ मार्च २०२३ रोजीचा विभागीय सहनिबंधक, मुंबई यांचा आदेश कायम ठेवण्यात असल्याचा आदेश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.

मागच्या महिन्यात फेटाळले दोघांचे अर्ज
यापूर्वी आ.तान्हाजी मुटकुळे व माजी आ.बाबाजानी दुर्राणी हे बँक संचालक पदासाठी अपात्र ठरले. त्यांचाही पुनर्विचार अर्ज सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी फेटाळला आहे. त्यामुळे तेही अपात्र ठरले. हे दोघे पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया लढत असल्याचे सांगितले जाते. आता बँकेचे अध्यक्ष असलेल्या आ. सुरेश वरपूडकर यांनाच संचालकपदावरून अपात्र ठरविल्याचा धक्का बसला आहे.

Web Title: Parbhani Zilla Bank Chairman Suresh Varpoodkar shocks; Disqualification also remains with the Minister of Co-operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.