परभणी जिल्हा परिषद :विविध प्रश्नांवर गाजली सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:56 AM2018-06-21T00:56:18+5:302018-06-21T00:56:18+5:30

पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़

Parbhani Zilla Parishad: General Sabha meeting on various issues | परभणी जिल्हा परिषद :विविध प्रश्नांवर गाजली सर्वसाधारण सभा

परभणी जिल्हा परिषद :विविध प्रश्नांवर गाजली सर्वसाधारण सभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़
येथील जिल्हा परिषदेच्या बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या सभेला सुरुवात झाली़ याप्रसंगी उपाध्यक्ष भावनाताई नखाते, सभापती उर्मिलाताई बनसोडे, श्रीनिवास मुंडे, अशोक काकडे, राधाबाई सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) एम़व्ही़ करडखेलकर यांची उपस्थिती होती़ प्रारंभी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन करण्यात आला़ या सभेत एकूण ७ विषय चर्चेसाठी ठेवले होते़ तसेच ऐनवेळच्या दोन विषयांवरही चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या २०१८-१९ वर्षाच्या विकासाचा आराखडा तयार करून तो नियोजन समितीकडे सादर करण्याचा विषय चर्चेला आला़ विविध विभागांच्या कामांचा अंतर्भाव करून २५ कोटी २५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी हा ठराव समोर ठेवण्यात आला़ परंतु, या आराखड्यात समाविष्ट केलेल्या कामांची यादी जि़प़ सदस्यांना दिली नसल्याने सदस्यांनी या विषयावर आक्षेप नोंदविला़ सर्व गटांचा समान सहभाग करून ७०:३० च्या फार्मुल्याप्रमाणे निधीचे वितरण व्हावे, अशी मागणी सदस्यांनी केली़ त्यावर सदस्यांना कामांची यादी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले़ त्यानंतर पुढील विषयावर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, शिवसेनेचे गटनेते राम खराबे, विष्णू मांडे, समशेर वरपूडकर, भगवान सानप, राजेश फड, डॉ़ सुभाष कदम आदींनी या विषयावर चर्चा केली़
शिक्षण विभागाच्या रिक्त पदांचा विषयही सभेमध्ये गाजला़ शिक्षण विभागाने आपल्या सोयीनुसार ‘कंपल्सरी व्हॅकंट’ पदे ठेवल्याचा आक्षेप सदस्यांनी घेतला़ ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तेथील पदे रिक्त ठेवणे अपेक्षित असताना विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या शाळांमधील पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे़, असे डॉ़ सुभाष कदम, विष्णू मांडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भातील अहवाल लवकरच सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत़ तसेच आरटीई कायद्यानुसार शाळांचे निकष ठरविलेले असतात़ परंतु, तपासी अधिकारी आरटीई इंडिकेटर तपासत नाहीत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. अनेक शाळा आरटीई कायद्याचे निकष पूर्ण करीत नसताना त्यांचा अहवाल मात्र सकारात्मक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांची एक महिन्याच्या आत तपासणी करून आरटीई इंडिकेटरचा अहवाल सादर केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी सभागृहास सांगितले़
दुपारी ३ वाजता सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा सायंकाळी ६़३० वाजेपर्यंत सुरू होती़ या सभे दरम्यान, गटनेते श्रीनिवास जोगदंड, राम खराबे, अजय चौधरी यांच्यासह जि.प. सदस्य विष्णू मांडे, मीनाताई राऊत, अरुणाताई काळे, बाळासाहेब रेंगे, किशनराव भोसले आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला़
पाणीपुरवठा अभियंत्यांची होणार चौकशी
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, डॉ़ सुभाष कदम, भगवान सानप यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसूकर यांची चौकशी करण्याची मागणी सभागृहासमोर केली़ अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना बंद आहेत़ आराखड्यानुसार कामे झाली नाहीत, असा तक्रारींचा सूर सदस्यांनी आळविला़ त्याचप्रमाणे जि़प़ सदस्य भगवान सानप यांनीही ग्रामीण भागात हातपंपांवर क्युरिफाईन पुरवठा करण्याच्या कंत्राटात गैरप्रकार झाल्याचे नमूद केले़ ९९ लाख रुपयांचे हे कंत्राट असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली़ यावर जि़प़ मुख्य कार्यकारी पृथ्वीराज यांनी वसूकर यांची चौकशी करण्यासाठी समितीची नियुक्ती केली जाईल, असे सभागृहासमोर सांगितले़

Web Title: Parbhani Zilla Parishad: General Sabha meeting on various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.